“६ हजार कोटींचा निधी आणला, पण बूथवरील चुकांनी पराभव झाला”
— शहाजीबापू पाटील यांची खंत; कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन
वेळापुरात शिवसेनेचा शक्तीमेळावा; ‘बूथ जिंका, निवडणूक जिंका’चा नारा देत २०२९ साठी रणशिंग फुंकले
वेळापूर (ता. माळशिरस) : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळापूर येथे शिवसेनेचा भव्य शक्तीमेळावा पार पडला. ‘एसआयआर’ मतदार यादी
पुनरीक्षण, बूथ रचना आणि संघटन मजबुती या मुद्द्यांवर झालेल्या या मेळाव्यात शिवसेनेने सांगोला आणि माळशिरस मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आगामी राजकीय लढाईची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
शिवसेनेच्या ‘BLA-2’ अभियानांतर्गत आयोजित या मेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे, खासदार ज्योती वाघमारे,
माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हजारो शिवसैनिकांच्या घोषणांनी वेळापूर परिसर दणाणून गेला होता.
सभेत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगोला तालुक्यातील बूथ व्यवस्थापनाचे तोंडभरून कौतुक केले. “३०५ बूथसाठी ६१० BLA नियुक्त करून ऑनलाईन मतदार पुनरीक्षण सुरू आहे, ही संघटनात्मक ताकद विरोधकांसाठी धोक्याची घंटा आहे,” असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील मतांच्या बेरजेनुसार सांगोल्यात शिवसेनेचे पारडे जड असल्याचा दावा करत त्यांनी “२०२९ मध्ये सांगोल्याचे आमदार पुन्हा शहाजीबापू पाटीलच असतील,” असा विश्वास व्यक्त केला.
याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय उठावाचे प्रमुख शिलेदार शहाजीबापू पाटील असल्याचे सांगत सामंत यांनी त्यांच्या
भूमिकेचे जोरदार कौतुक केले. “गुवाहाटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत शहाजीबापूंनी शिवसेनेची ओळख अधिक मजबूत केली,” असेही ते म्हणाले.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात मागील निवडणुकीतील पराभवाची खंत व्यक्त करत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. “तालुक्यासाठी ६ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणला,
बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना मंजूर केली; मात्र बूथ स्तरावरील त्रुटी आणि मतदार याद्यांतील दुर्लक्ष महागात पडले,” असे ते म्हणाले.
“आता प्रत्येक बूथ मजबूत करायचा, योग्य मतदारांची नावे कायम ठेवायची आणि बोगस नावे हटवायची, हा शिवसैनिकांचा निर्धार असला पाहिजे,” असे सांगत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी स्वागत केले. दत्ता मगर आणि सागर पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यासाठी नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, पप्पू धनवजीर, अजय सरगर, बाळासाहेब बंडगर, उमेश पाटील, गुंडादादा खटकाळे, योगेश खटकाळे, धनंजय काळे,
उदयसिंह घाडगे, अमित पाटील, चंद्रकांत चौगुले, महेंद्रकुमार बाजारे, विजय मगर, तानाजी भोसले, दीपक ऐवळे यांच्यासह सांगोला व माळशिरस तालुक्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
कडक उन्हातही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे वेळापूरमध्ये शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा दिसून आली.



.jpg)

.jpg)

0 Comments