Breaking News

जुनोनीजवळ भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या मायलेकांचा जागीच मृत्यू

जुनोनीजवळ भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या मायलेकांचा जागीच मृत्यू


सांगोला प्रतिनिधी : अधिक मासानिमित्त पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा जुनोनीजवळ भीषण अपघात होऊन मायलेकांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले.

 ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २५ मे) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सांगोला-मिरज महामार्गावरील जुनोनी येथील माणदेशी विद्यालयाजवळ घडली.

या अपघातात संदीप चिंतामणी भोसले (वय ३०) व रेखा चिंतामणी भोसले (वय ६५, दोघेही रा. पलूस, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ज्योती संदीप भोसले,

 विद्या अनिल भोसले, अनिल चिंतामणी भोसले, वेदांत अनिल भोसले (वय १०), दुर्वा अनिल भोसले (वय ८) आणि वैभव अनिल भोसले (वय १२) हे जखमी झाले आहेत. 

जखमींपैकी एका महिलेवर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांवर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पलूस औद्योगिक वसाहतीतील भोसले कुटुंबीय सोमवारी सकाळी कारने पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. दर्शनानंतर ते पेनूर येथील नातेवाईकांकडे जाणार होते.

 दरम्यान, जुनोनीजवळ समोरील कारचे अचानक टायर फुटल्याने मागून येणाऱ्या भोसले यांच्या कारची जोरदार धडक झाली. 

धडकेनंतर कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन तब्बल तीन ते चार वेळा पलटी झाली.

अपघात इतका भीषण होता की, संदीप भोसले आणि त्यांच्या आई रेखा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

 अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभूराजे साळुंखे यांनी खबर दिली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments