पंढरपूर हादरलं! अत्याचाराच्या वेदना सहन न झाल्याने तरुणीची आत्महत्या; आरोपी अद्याप फरार
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या एका तरुणीने मानसिक त्रास असह्य झाल्याने ॲसिड प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दीड महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या या तरुणीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच एका व्यक्तीने पीडित तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक
अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर तरुणी पूर्णपणे मानसिक धक्क्यात गेली होती.
अखेर ११ एप्रिल रोजी तिने टोकाचे पाऊल उचलत ॲसिड प्राशन केले. गंभीर अवस्थेत तिला प्रथम पंढरपूर, त्यानंतर
सोलापूर आणि पुढे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दीर्घ उपचारानंतर तिची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, दीड महिना उलटूनही मुख्य आरोपीला अटक न झाल्याने पीडित कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
तरुणीच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट करकंब पोलीस ठाण्यासमोर आणत
ठिय्या आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही,”
अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांची समजूत काढली आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


0 Comments