Breaking News

सांगोला तालुक्यात अवकाळीचा तडाखा; वादळी वाऱ्यासह गारपिटीने डाळिंब बागांचे मोठे नुकसान

सांगोला तालुक्यात अवकाळीचा तडाखा; वादळी वाऱ्यासह गारपिटीने डाळिंब बागांचे मोठे नुकसान


सांगोला : तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकरी व नागरिकांची मोठी धावपळ उडाली. चोपडी, नाझरे,

 बलवडी, सोमेवाडी, हातीद, उदनवाडी, गौडवाडी आदी गावांमध्ये दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली.

विशेषतः चोपडी परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. चौगुले मळा परिसरात अनेक शेतकऱ्यांनी उन्हापासून व रोगांच्या प्रादुर्भावापासून संरक्षणासाठी डाळिंब बागांवर केलेले

 आच्छादन वादळी वाऱ्यामुळे फाटून गेले. त्याचबरोबर गारांच्या माऱ्यामुळे फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वादळी वाऱ्याच्या तडाख्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर चोपडी गावातील चौकातील विजेचा खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा काही

 काळ खंडित करण्यात आला होता. महावितरण विभागाकडून नुकसानग्रस्त विद्युत खांब व तारांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मेहनतीवर अवकाळीचे सावट

वर्षभर कष्ट घेऊन जोपासलेल्या बागांचे काही क्षणांत झालेले नुकसान पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. चोपडी येथील शेतकरी लक्ष्मण बबन चौगुले यांच्या 

सुमारे ७०० डाळिंब झाडांवरील आच्छादन पूर्णपणे फाटले असून जवळपास १०० झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच अशोक मधुकर चौगुले यांच्या डाळिंब बागेवरील संरक्षणात्मक आच्छादनही वाऱ्याने फाटून गेल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पहिल्याच अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments