हंगिरगे येथे विहिरीत पडलेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
सांगोला : तालुक्यातील हंगिरगे येथे शेतातील विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदाशिव तुकाराम बिराजदार (वय ६५, मूळ रा. सांगली,
सध्या रा. हंगिरगे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची प्राथमिक नोंद सांगोला पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपासासाठी कागदपत्रे जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हंगिरगे येथील सोमनाथ कदम यांच्या शेतातील विहिरीजवळ सदाशिव बिराजदार यांचा तोल
जाऊन ते विहिरीत पडले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान १५ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे हंगिरगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास संबंधित पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे.


0 Comments