Breaking News

ब्रेकिंग न्यूज : सांगोला-महुद पुलाजवळ भीषण अपघात; शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम भोजने यांचा जागीच मृत्यू

ब्रेकिंग न्यूज : सांगोला-महुद पुलाजवळ भीषण अपघात; शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम भोजने यांचा जागीच मृत्यू


सांगोला | प्रतिनिधी सांगोला-महुद पुलाजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम भोजने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 या घटनेमुळे नंदूर गावासह मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तुकाराम भोजने हे दुचाकीवरून प्रवास करत असताना सांगोला-महुद पुलाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. 

धडक इतकी भीषण होती की, ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हवालदार सचिन भोसले,

 नितीन घुले आणि बोराटे यांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच रुग्णवाहिका चालक सिद्धेश्वर भोसले यांनी मदतकार्य करत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला.

मूळचे नंदूर येथील रहिवासी असलेले तुकाराम भोजने हे शिवसेनेचे सक्रिय आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. तळागाळातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आणि पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांनी परिसरात वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या अकाली निधनामुळे नंदूर गावाने एक लढवय्या आणि अभ्यासू कार्यकर्ता गमावल्याची भावना स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी सांगोला पोलीस पुढील तपास करत असून संबंधित कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments