Breaking News

पहिलं लग्न लपवलं, दीड लाख उकळले! मंगळवेढ्यात ‘नवरी गँग’चा पर्दाफाश

पहिलं लग्न लपवलं, दीड लाख उकळले! मंगळवेढ्यात ‘नवरी गँग’चा पर्दाफाश


मंगळवेढा तालुक्यात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जमत नसलेल्या तरुणांना लक्ष्य करून 

एका महिलेसोबत विवाह ठरवून तब्बल दीड लाख रुपये उकळल्याची घटना उघड झाली असून, पोलिसांनी ‘नवरी’सह दोघांना अटक केली आहे. तर आणखी दोन आरोपी फरार आहेत.

लग्नाच्या नावाखाली आर्थिक गंडा

बावची येथील नामदेव जाधव (वय ३८) हे विवाहासाठी मुलीच्या शोधात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत रड्ढे येथील काही मध्यस्थांनी त्यांची ओळख

 अश्विनी मारुती दानोळे (रा. देवरुख) हिच्याशी करून दिली. लग्न ठरवून देण्याच्या बहाण्याने आरोपींनी जाधव यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.

संशय वाढला आणि सत्य बाहेर आलं

लग्नाची बोलणी पुढे सुरू असताना काही संशयास्पद बाबी समोर आल्या. चौकशी केली असता, अश्विनी हिचे यापूर्वीच लग्न झाले असल्याचे आणि तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी असल्याचे उघड झाले. ही माहिती जाणूनबुजून लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नामदेव जाधव यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

नवरीसह दोघे अटकेत

पोलिसांनी या प्रकरणात अश्विनी मारुती दानोळे हिला अटक केली असून, पिंटू उर्फ नाना कोळेकर यालाही ताब्यात घेतले आहे. तर शिवाजी कोळेकर आणि युवराज कांबळे हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

परिसरात खळबळ

या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी नागरिकांना विवाह ठरवताना संपूर्ण शहानिशा करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments