Breaking News

दिपकआबांच्या पुढाकाराला यश! सांगोल्यात सकाळी-रात्रीचे भारनियमन थांबणार; शेतकऱ्यांना ८ तास अखंड वीजपुरवठ्याचे आश्वासन

दिपकआबांच्या पुढाकाराला यश! सांगोल्यात सकाळी-रात्रीचे भारनियमन थांबणार;


शेतकऱ्यांना ८ तास अखंड वीजपुरवठ्याचे आश्वासन

सांगोला : माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांची शेतकरी शिष्टमंडळासोबत बैठक; ग्राहक-प्रशासन समन्वयातून मार्ग काढण्यावर भर

सांगोला | प्रतिनिधी सांगोला शहर व तालुक्यातील वाढत्या भारनियमनाच्या समस्येवर अखेर सकारात्मक तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पुढाकारानंतर महावितरण प्रशासनाने शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता मधुकर साळवे यांनी सांगितले की, सांगोला शहर आणि तालुक्यात सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तसेच

 सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत भारनियमन करण्यात येणार नाही. याशिवाय शेतीपंपांसाठी पूर्ण क्षमतेने आठ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

शुक्रवार, १९ जून रोजी सांगोला येथील महावितरण कार्यालयात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, शेतकरी शिष्टमंडळ आणि महावितरणच्या

 अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी व पशुपालकांच्या अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली.

यापूर्वी १५ जून रोजी वाढत्या भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर दिपकआबा साळुंखे पाटील यांनी थेट महावितरण कार्यालयात धडक देत, शेतकरी आणि पशुपालकांना त्रासदायक ठरणारे भारनियमन तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. 

अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगोल्यात येऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते.

बैठकीत बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील यांनी वीज ग्राहक आणि महावितरण प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आणि समन्वय राखण्याचे आवाहन केले.

 तसेच सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या कालावधीत जास्त वीज वापरणारी उपकरणे वापरणे टाळण्याची विनंती त्यांनी शेतकरी आणि पशुपालकांना केली.

"वीज यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी ग्राहकांनीही आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासन आणि ग्राहक यांच्या परस्पर सहकार्यामुळेच भारनियमनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो," असे ते म्हणाले.

या बैठकीस ज्येष्ठ नेते तानाजी पाटील, शिवाजी बनकर, विजय येलपले, विजय पवार, चंद्रकांत चौगुले, चंद्रकांत कारंडे, सोमनाथ लोखंडे, सूर्याजी खटकाळे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेतकरी आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया | मधुकर साळवे, कार्यकारी अभियंता, महावितरण पंढरपूर विभाग

"माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील आणि शेतकरी शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेतून शेतकरी व पशुपालकांच्या अडचणी समजल्या.

 सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज यंत्रणेवर अतिरिक्त भार पडणार नाही, यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे. महावितरण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे."

अजनाळेतील भंडगेवस्तीचा प्रश्न ऐरणीवर

अजनाळे (ता. सांगोला) येथील भंडगेवस्तीमध्ये अनेक दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने संपूर्ण दलितवस्ती अंधारात असल्याचा मुद्दा जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले यांनी बैठकीत मांडला. 

यावर दिपकआबा साळुंखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने कारवाईची मागणी केली. प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत भंडगेवस्तीतील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments