दिघंची–भोसे राज्य मार्गासाठी ३४२ कोटींची मंजुरी:
शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यश, श्रेयावरून लवटे यांची स्पष्ट भूमिका
मार्च २०२४ पासून सातत्याने प्रयत्न सुरू होते; "या कामाचे श्रेय दुसऱ्यांनी घेऊ नये" – दादासाहेब लवटे
सांगोला | प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या दिघंची जिल्हा हद्द ते वाणी चिंचाळे–भोसे
या राज्य मार्ग क्रमांक ३८६ च्या रुंदीकरण व सुधारणेसाठी ३४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती
शिवसेनेचे तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी दिली.
या निधीच्या मंजुरीमागे माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी मार्च २०२४ पासून केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
लवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, १३ मार्च २०२४ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी
राज्य मार्ग क्रमांक ३८६ साठी सुमारे ३५० कोटी रुपयांच्या निधीची लेखी मागणी शासनाकडे केली होती.
त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
दरम्यान, मंत्रिमंडळातील बदलानंतर ४ ऑगस्ट २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या प्रस्तावास मंजुरी देत निधीची तरतूद केली.
हा निधी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (ADB) माध्यमातून उपलब्ध करण्यात आला असल्याचेही लवटे यांनी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत दिघंची जिल्हा हद्द–खवासपूर–लोटेवाडी–सोनलवाडी–एखतपूर–सांगोला–वाढेगाव–मेडशिंगी–आलेगाव–वाकी–घेरडी–
वाणी चिंचाळे–भोसे या मार्गाचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.
यावेळी दादासाहेब लवटे यांनी या कामाच्या श्रेयावरही स्पष्ट भूमिका मांडली. "या रस्त्यासाठी सुरुवातीपासून अॅड. शहाजीबापू पाटील यांनीच सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे या मंजुरीचे श्रेय इतर कोणीही घेऊ नये," असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.


0 Comments