Breaking News

हार-तुरे नकोत, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य द्या! बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांचे वाढदिवसानिमित्त अनोखे आवाहन

हार-तुरे नकोत, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य द्या!


बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांचे वाढदिवसानिमित्त अनोखे आवाहन

सांगोला, प्रतिनिधी : वाढदिवस म्हटले की हार, तुरे, बुके आणि सत्काराचा सोहळा हे चित्र सर्वसामान्यपणे पाहायला मिळते. मात्र बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत 

एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. 25 जून रोजी होणारा त्यांचा वाढदिवस यंदाही गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी समर्पित करण्यात आला आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणार्‍या कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी हार, बुके, शाल किंवा इतर भेटवस्तू न आणता विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर तसेच इतर शालेय साहित्य आणावे, असे आवाहन बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या उपक्रमाला दरवर्षी मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.

 वाढदिवसानिमित्त जमा होणारे शालेय साहित्य ते स्वतः सांगोला शहर व तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन गरजू विद्यार्थ्यांना वाटप करतात.

आजच्या महागाईच्या काळात अनेक कुटुंबांना मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे कठीण जाते. अशा विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य मोठा आधार ठरत असून त्यांच्या शिक्षणाला नवी उभारी मिळत आहे. त्यामुळे बापूसाहेब ठोकळे यांचा हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

याशिवाय, ज्यांना प्रत्यक्ष भेटून शालेय साहित्य भेट देणे शक्य होणार नाही, त्यांनी आपल्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार्‍या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून तो समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि समाजोपयोगी कार्यासाठी खर्च व्हावा, असा संदेश देत बापूसाहेब ठोकळे यांनी सर्व शुभेच्छुकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

समाजकारण, शिक्षणप्रेम आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवणार्‍या या अभिनव उपक्रमाची तालुकाभर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या सामाजिक जाणिवेच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments