खंडोबा देवस्थान परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे गडकरींना निवेदन
सांगोला : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांच्या फलटण ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५)
पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार Dhairyasheel Mohite Patil यांनी सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे महत्त्वाचे निवेदन सादर केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील श्री खंडोबा देवस्थान परिसरात सध्या वाहतुकीसंदर्भात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
भाविकांची वाढती संख्या आणि स्थानिक नागरिकांची दैनंदिन वाहतूक लक्षात घेता
सर्व्हिस रोडवरील डिव्हायडरची रचना योग्य पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली.
विशेषतः सांगली, विटा, खानापूर आणि आटपाडी भागातून येणाऱ्या भाविकांना पूर्वमुखी
प्रवेशद्वारातून देवस्थानात सहज प्रवेश मिळावा, यासाठी वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
सध्याच्या रचनेमुळे भाविकांना मोठा वळसा घालावा लागत असून स्थानिक ग्रामस्थांनाही वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी देवस्थान परिसरातील सुरक्षितता, वाहतुकीची सुलभता आणि भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करावे,
अशी मागणीही करण्यात आली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.


0 Comments