वाळू प्रकरणाच्या संशयातून सांगोल्यात मध्यरात्री रक्तरंजित हल्ला; कोयता, दगडाने चौघांना मारहाण
सांगोला तालुक्यातील वाटंबरे परिसरात वाळू वाहतुकीची माहिती तहसीलदारांना दिल्याच्या संशयातून मध्यरात्री तुफान मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादासो जालिंदर पवार (वय 40, रा. वाटंबरे, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. 14 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11.15 वाजण्याच्या सुमारास वाटंबरे गावच्या शिवारातील सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील पुलाखाली ही घटना घडली.
या प्रकरणी दत्तात्रय भगवान पवार, दिपक दत्तात्रय पवार, अक्षय दत्तात्रय पवार (रा. वाटंबरे), तसेच यश सांळुखे व एक अनोळखी युवक (रा. राजुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, “तुम्ही आमच्या वाळूच्या गाड्यांची माहिती तहसीलदारांना दिल्यामुळे आम्हाला दंड झाला,” असा आरोप करत आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर दगड, विटा, कोयता तसेच लाथाबुक्क्यांनी दादासो पवार, त्यांचा मुलगा विक्रम पवार, भाऊ दिलीप पवार आणि पुतण्या प्रथमेश पवार यांना बेदम मारहाण करून जखमी केले.
यावेळी दिपक पवार याने एमएच 10 एडब्ल्यू 2829 क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून तलवारीसारखे हत्यार काढून अंगावर धावून आल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गु.र.नं. 425/2026 दाखल करण्यात आला असून बीएनएस 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. बनसोडे करीत आहेत.


0 Comments