अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात ‘भोंदूगिरी’विरोधात मोठा झटका; दोन महिन्यांत ३५ ढोंगी बाबा तुरुंगात
नाशिक | प्रतिनिधी राज्यात गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात मोठी मोहीम उभी राहिली आहे. गेल्या दोन महिन्यांत राज्यातील तब्बल ३५ भोंदू बाबा, मांत्रिक,
पाद्री आणि हकीम यांच्याविरोधात विविध जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईची अधिकृत माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांनी जाहीर केली.
अंनिसच्या माहितीनुसार, ग्रामीण भागापुरती मर्यादित नसलेली ही भोंदुगिरी आता मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही पसरली होती.
पोलिसांनी अनेक ठिकाणी अचानक धाडी टाकत तथाकथित ‘दरबार’ उद्ध्वस्त केले. या कारवायांमध्ये जादूटोणा विरोधी कायद्यांसह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महिलांचे शोषण, गुप्तधनाचे आमिष आणि लाखोंची फसवणूक
समोर आलेल्या अनेक प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण, आजार बरे करण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक, गुप्तधन काढून देण्याचे आमिष आणि मानसिक
छळ अशा गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. काही आरोपींनी भक्तांना चमत्काराचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
“भोंदूगिरीला धर्म नसतो” – अंनिसचा दावा
अंनिसने स्पष्ट केले की, कारवाई झालेल्या ३५ जणांमध्ये विविध धर्मीयांचा समावेश आहे. त्यामुळे हा लढा कोणत्याही धर्माविरोधात नसून अंधश्रद्धा आणि शोषणाविरोधात असल्याचे समितीने नमूद केले आहे.
राज्यभरातील कारवाईत सोलापूरचाही समावेश
जाहीर करण्यात आलेल्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील मोहन मामा भोसले आणि टेंभुर्णी येथील नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर यांचाही समावेश आहे.
तसेच पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, रायगड, नांदेड, अकोला, भंडारा, जळगाव आणि धुळे या भागांतील विविध भोंदू बाबांवर कारवाई करण्यात आली आहे.
अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अंनिसकडून जाहीर करण्यात आलेली ३५ भोंदू बाबांची यादी:
नाशिक विभाग:
१) अशोक कुमार खरात (नाशिक)
२) विठोबा वाल्मीक जाट (सातपूर, नाशिक)
३) महेशगिरी उर्फ महेश काकडे (लासलगाव, नाशिक)
४) चंद्रकांत राजेंद्र माळी (इगतपुरी, नाशिक)
पुणे आणि अहिल्यानगर परिसर
५) पंकज देवराम घोलप (येडगांव, पुणे)
६) नाना बर्डे (आळे फाटा, पुणे)
७) अनिल सोलोमन सिंग (पादरी - पुणे)
८) पिंटू धुमाळ (बारामती, पुणे)
९) औदुंबर गडदे (स्वारगेट, पुणे)
१०) नवनाथ गवळी (खेड, पुणे)
११) श्याम महाराज राठोड (दिघी, पुणे)
१२) किसन तळपे (मंदोशी, खेड)
१३) गडगेबाबा राजेंद्र गडगे (संगमनेर, अहिल्यानगर)
१४) गणेश शिंदे (श्रीरामपूर, अहिल्यानगर)
१५) अशोक मधुकर आढाव (श्रीरामपूर, अहिल्यानगर)
१६) शिव भाऊ सोनवणे (सर्जेपुरा, अहिल्यानगर)
१७) यशवंत एकनाथ थोरात (पारनेर, अहिल्यानगर)
मुंबई, ठाणे आणि कोकण विभाग:
१८) ऋषिकेश वैद्य (वसई, मुंबई)
१९) अल्ताफ रईस खान (मालाड, मुंबई)
२०) रिधम पांचाळ (मालाड, मुंबई)
२१) इरफान नियाज अहमद (कांदिवली, मुंबई)
२२) रमेश गुप्ता (मालाड, मुंबई)
२३) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा (नवी मुंबई)
२४) अब्दुल रशीद शेख (खालापूर, रायगड)
२५) शिवराम पराश सावर (पालघर)
२६) शाहिद शेख (खडकपाडा, कल्याण)
२७) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित (ठाणे)
सोलापूर आणि मराठवाडा विभाग:
२८) मोहन मामा भोसले (कुर्डुवाडी, सोलापूर)
२९) नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर (टेंभुर्णी, सोलापूर)
३०) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे (बिलोली, नांदेड)
३१) हरिगिरी दत्तगिरी महाराज (भाग्यनगर, नांदेड)
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र:
३२) चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर, अकोला)
३३) हेमदास किसन बावणे (अड्याळ, भंडारा)
३४) अल्ताफ हसन मदारी (जळगाव)
३५) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते (पश्चिम देवपूर, धुळे)


0 Comments