टेंभूचे जीवनदायी पाणी अखेर माण नदीत; सांगोला तालुक्याला दिलासा, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला प्रतिनिधी : दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या सांगोला तालुक्यासाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आज माण नदीपात्रात दाखल होणार
असून, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
टेंभू प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी प्रथम आटपाडी तलावात पोहोचले असून, त्यानंतर ते माण नदीकडे वळविण्यात आले आहे.
आज संध्याकाळपर्यंत हे पाणी नदीपात्रात दाखल होणार असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पाण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
२८ एप्रिल रोजी त्यांनी लेखी पत्राद्वारे उन्हाळी आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत टेंभू योजनेतील पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी आणि राजुरी परिसरातील तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरावेत तसेच खवासपूर ते मेथवडे दरम्यानच्या सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी पोहोचावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
माण नदीत पाणी आल्याने परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
“तालुक्यातील कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये,” अशा सूचना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
त्यांच्या प्रयत्नांमुळे टेंभूचे पाणी सांगोल्यात पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, ही मागणी मान्य करून टेंभू योजनेतून पाणी सोडण्यास सहकार्य केल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.


0 Comments