Breaking News

चिकमहूद पोस्ट कार्यालयाचा कारभार रामभरोसे; पोस्टमास्टर नसल्याने नागरिक हैराण सरपंच शोभा कदम यांचा इशारा : चार दिवसांत कायमस्वरूपी नेमणूक न झाल्यास कार्यालयाला टाळे

चिकमहूद पोस्ट कार्यालयाचा कारभार रामभरोसे; पोस्टमास्टर नसल्याने नागरिक हैराण


सरपंच सौ.शोभा कदम यांचा इशारा : चार दिवसांत कायमस्वरूपी नेमणूक न झाल्यास कार्यालयाला टाळे

सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील पोस्ट कार्यालयात कायमस्वरूपी पोस्टमास्टर नसल्यामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले असून खातेदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

“असून अडचण आणि नसून खोळंबा” अशी अवस्था या पोस्ट कार्यालयाची झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

चिकमहूद गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजारांच्या घरात असून गावासह परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांतील नागरिक या पोस्ट कार्यालयावर अवलंबून आहेत. 

ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेत हे कार्यालय कार्यरत आहे. पोस्ट कार्यालयातून विविध शासकीय योजनांचे आर्थिक व्यवहार तसेच नागरिकांची ठेव-जमा, पैसे काढणे आदी कामे नियमित सुरू असतात.

मात्र, काही महिन्यांपूर्वी येथील पोस्टमास्टर योगेश कोळेकर यांची बदली झाल्यानंतर कार्यालयाचा कारभार विस्कळीत झाला.

 त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात चार पोस्टमास्टर पाठविण्यात आले, परंतु आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ शकले नाहीत. परिणामी नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले असून ग्रामस्थांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

पोस्ट कार्यालयातून सुकन्या समृद्धी योजना, मुदत ठेव, बचत खाते व्यवहार, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ पेन्शन, लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, घरकुल योजना तसेच

 रोजगार हमी योजनांशी संबंधित आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. दररोज लाखो रुपयांची उलाढाल या कार्यालयातून होत असते. मात्र सध्या व्यवहार ठप्प असल्याने लाभार्थी आणि खातेदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, “येत्या चार दिवसांत कायमस्वरूपी पोस्टमास्टरची नेमणूक न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने पोस्ट कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल,”

 असा इशारा सरपंच शोभा कदम यांनी दिला आहे. त्यामुळे आता संबंधित वरिष्ठ अधिकारी या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments