Breaking News

महाराष्ट्र दिनी ‘महाडायलिसिस’ योजनेचा विस्तार; १२ नव्या केंद्रांमुळे किडनी रुग्णांना मोठा दिलासा

महाराष्ट्र दिनी ‘महाडायलिसिस’ योजनेचा विस्तार; १२ नव्या केंद्रांमुळे किडनी रुग्णांना मोठा दिलासा


सोलापूर : राज्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने ‘महाडायलिसिस’ योजनेचा विस्तार जाहीर केला आहे. 

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी राज्यभरातील १२ नव्या डायलिसिस केंद्रांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना मोफत व सुलभ उपचार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 सध्या राज्यात ९२ केंद्रांमधून ५५८ डायलिसिस बेड कार्यरत असून, नव्या केंद्रांमुळे एकूण संख्या १०४ वर पोहोचणार आहे.

या योजनेंतर्गत ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० बेडची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षित तंत्रज्ञ, नर्सेस आणि नेफ्रोलॉजिस्ट यांच्या देखरेखीखाली रुग्णांना सुरक्षित व दर्जेदार उपचार दिले जात आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, ही सेवा पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

लोकार्पण होणाऱ्या नव्या केंद्रांमध्ये मुरगुड (कोल्हापूर), मूल (चंद्रपूर), दारव्हा (यवतमाळ), केज (बीड), इगतपुरी (नाशिक), रावेर (जळगाव), मंगळवेढा (सोलापूर),

 ढेबेवाडी (सातारा), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), कुरखेडा (गडचिरोली), दापोली (रत्नागिरी) आणि बदलापूर (ठाणे) या ठिकाणांचा समावेश आहे.

रुग्णांना डायलिसिससोबतच रक्त तपासणी, आवश्यक औषधे, इंजेक्शन तसेच आहारतज्ज्ञांचा सल्ला या सर्व सेवा पूर्णतः मोफत दिल्या जात आहेत.

 केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने एचएलएल लाइफकेअर लिमिटेडमार्फत ही योजना राबवली जात असून, गुणवत्तेला विशेष प्राधान्य दिले जात आहे.

‘महाडायलिसिस’ योजनेमुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांवरील खासगी उपचारांचा आर्थिक बोजा कमी होत असून, सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वासही अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments