एजंटांना बंदी; सोलापूर बांधकाम कामगार कार्यालयात पारदर्शकतेचा नवा अध्याय कामगारांना थेट संपर्काचे आवाहन
सोलापूर | प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कार्यालयात सुरू असलेल्या खासगी एजंटांच्या हस्तक्षेपावर अखेर कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रभारी सहायक आयुक्त मंगेश झोले यांनी एजंटांना कार्यालयात ‘नो एन्ट्री’ घोषित करत पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची सुरुवात केली असल्याची माहिती दिली.
यापूर्वी या कार्यालयात खासगी एजंटांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला होता. त्यांच्या माध्यमातून भांडी वाटप, शिष्यवृत्ती अनुदान, तसेच वैद्यकीय उपचार बिलांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे उघड झाले होते. या प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार समोर आला होता.
प्रभारी सहायक आयुक्त मंगेश झोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ या गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केल्या.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एजंटांना कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बांधकाम कामगारांच्या संदर्भात कोणत्याही संघटना प्रतिनिधींनाही चौकशी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
झोले यांनी सांगितले की, बांधकाम कामगार बहुतेक गरीब व सामान्य कुटुंबातील असतात. एजंट त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्याकडून अवाजवी पैसे उकळतात आणि चुकीच्या मार्गाने कामे करून देण्याचे आमिष दाखवतात. यामुळे अनेक नियमबाह्य व्यवहार घडत होते.
कामगारांना थेट संपर्काचे आवाहन
बांधकाम कामगारांनी आपल्या नोंदणी, नूतनीकरण किंवा इतर शासकीय योजनांसाठी कोणत्याही एजंटाची मदत न घेता थेट कार्यालयातील नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,
असे आवाहन झोले यांनी केले आहे. यामुळे कामकाज अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापूरमधील या निर्णयामुळे आता बांधकाम कामगारांना दिलासा मिळणार असून, भ्रष्टाचाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


0 Comments