Breaking News

“पुण्यतिथीच्या अनोखी आदरांजली! १५ भूमीहीन कुटुंबांना मोफत जमीन देत जरे बंधूंचा समाजासाठी आदर्श”

“पुण्यतिथीच्या अनोखी आदरांजली! १५ भूमीहीन कुटुंबांना मोफत जमीन देत जरे बंधूंचा समाजासाठी आदर्श”


सांगोला | प्रतिनिधी सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत खवासपूर (ता. सांगोला) येथे एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. स्व. अंकुश तात्या जरे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त 

त्यांच्या स्मृतीला अनोख्या पद्धतीने अभिवादन करत, वसंत आप्पा जरे यांनी १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुलासाठी स्वतःच्या मालकीची १५ गुंठे जमीन मोफत दिली.

रविवार, दि. १९ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, सभापती पुनम इंगवले, युवा नेते ॲड. दिग्विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्व. जरे यांना आदरांजली वाहिली.

🏠 घरकुलाच्या स्वप्नांना मिळाला आधार

राज्य शासनाच्या घरकुल योजनेत अनेक गरजू कुटुंबांना घर मंजूर होत असले, तरी स्वतःची जमीन नसल्यामुळे त्यांचे स्वप्न अधुरे राहते. हीच गरज ओळखून वसंत आप्पा जरे यांनी पुढाकार घेतला. संबंधित १५ कुटुंबांच्या नावावर जमीन करून देत, त्यांच्या घरकुल बांधणीचा मार्ग मोकळा केला.

या निर्णयामुळे अनेक कुटुंबांचे “स्वतःच्या घराचे” स्वप्न आता साकार होणार आहे. तसेच भविष्यातही अशाच गरजू कुटुंबांना मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

⭐ मानवतेचा जिवंत आदर्श

हा उपक्रम केवळ मदत नसून, समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. पुण्यतिथीचा दिवस केवळ श्रद्धांजलीपुरता न ठेवता, तो समाजहिताच्या कार्यात रूपांतरित करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

📦 चौकट : भावबंधाची अनोखी मिसाल

“जरे बंधू म्हणजे जणू आधुनिक राम-लक्ष्मण”

आजच्या काळात जमिनीच्या वादावरून सख्ख्या भावांमध्ये मतभेद होतात, अशा घटना नेहमीच समोर येतात. मात्र, वसंत आप्पा जरे यांनी आपल्या भावाच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्वतःची जमीन गरिबांना दान करून एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

रामायणातील राम-लक्ष्मणाची जोडी आपण ऐकतो, पण खवासपूरमध्ये ती प्रत्यक्ष पाहायला मिळाली, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments