धक्कादायक! ‘साध्या गाठीवर उपचार’ म्हणत थेट गर्भाशय काढले; पुण्यात ४ डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे | प्रतिनिधी पुण्यातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. साध्या गाठीवर उपचारासाठी गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचे भूल दिल्यानंतर थेट
गर्भाशयच काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने चार डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रुक येथील साई केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. केशवनगर परिसरात ब्युटी पार्लर
चालवणाऱ्या संबंधित महिलेला किरकोळ त्रास होत असल्याने सोनोग्राफी करण्यात आली होती. त्यामध्ये गर्भाशयात छोटी गाठ आढळली. याच गाठीवर उपचारासाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी ती रुग्णालयात दाखल झाली होती.
मात्र, भूल दिल्यानंतर डॉक्टरांनी कोणतीही पूर्वसंमती न घेता थेट महिलेचे संपूर्ण गर्भाशय काढल्याचा गंभीर आरोप आहे. हा प्रकार लक्षात येताच पीडित महिलेने मांजरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पीडितेच्या वतीने अॅड. विश्वास सातपुते यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. काढलेले गर्भाशय नेमके कुठे गेले?
अवयव तस्करीचा संबंध आहे का? यामागे मोठा कट आहे का? अशा प्रश्नांनी प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
दरम्यान, बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालातही संबंधित डॉक्टरांकडून अक्षम्य आणि गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख आणि डॉ. मोहम्मद शेख या चारही डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता या सर्वांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📢 पत्रकाराचे मत:
रुग्ण डॉक्टरांवर देवासारखा विश्वास ठेवतात. मात्र अशा प्रकारांमुळे संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेवरील विश्वास हादरतो. दोषींवर कठोर कारवाई होणे ही काळाची गरज आहे.
⚠️ सूचना:
आम्ही सत्य व पडताळणी केलेल्या बातम्यांनाच प्राधान्य देतो. कोणतीही माहिती चुकीची वाटल्यास कृपया आम्हाला कळवा.


0 Comments