चीज पर्याय” वापरावर प्रशासनाची कडक नजर; मेन्यूत स्पष्ट उल्लेख अनिवार्य
सांगोला / सोलापूर : जिल्ह्यातील उपाहारगृहे, हॉटेल्स, केटरिंग व्यवसाय तसेच फास्ट फूड विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे आणि कडक निर्देश जारी केले आहेत.
“चीज पर्याय” वापरून तयार होणाऱ्या सर्व अन्नपदार्थांबाबत आता ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पदार्थांच्या यादीत तसेच इलेक्ट्रॉनिक फलकावर “चीज पर्याय” असा ठळक उल्लेख करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत ग्राहकांना ते जे अन्न खात आहेत त्याची संपूर्ण आणि पारदर्शक माहिती मिळणे
हा त्यांचा मूलभूत अधिकार मानला जातो. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.
अन्नातील घटकपदार्थ, पोषणमूल्ये आणि आरोग्यविषयक माहिती स्पष्टपणे दर्शविणे प्रत्येक अन्न व्यवसायिकासाठी बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने अधोरेखित केले आहे.
तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी पनीर किंवा चीजऐवजी “चीज पर्याय” वापरून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे आढळून आले.
यामुळे प्रशासनाने या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
अन्न उत्पादक आणि पुरवठादारांनाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून उत्पादनाचे पॅकेजिंग व लेबलिंग भ्रामक नसावे,
तसेच “चीज पर्याय” असल्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक ठरणार आहे.
तसेच, विक्री पावतीवरही “चीज पर्याय” असा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पनीर म्हणून “चीज पर्याय” विक्री केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यवसायिकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची पारदर्शक माहिती देणे आवश्यक आहे.
विशेषतः “चीज पर्याय” वापरून तयार केलेल्या पदार्थांचा मेन्यू किंवा डिजिटल बोर्डवर स्पष्ट उल्लेख न केल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे.
सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी सर्व अन्न व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे अन्न व्यवसायात पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून ग्राहकांची फसवणूक रोखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


0 Comments