Breaking News

सांगोला-स्वारगेट एसटीचा वेग ‘कासवगती’त; ५ तासांचा प्रवास ८ तासांवर, प्रवासी त्रस्त

सांगोला-स्वारगेट एसटीचा वेग ‘कासवगती’त; ५ तासांचा प्रवास ८ तासांवर, प्रवासी त्रस्त


सांगोला : प्रतिनिधी सांगोला ते पुणे (स्वारगेट) दरम्यान धावणाऱ्या एसटी बस सेवेबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

वेळेत पोहोचण्याची अपेक्षा असताना बसचा वेग कमी असल्याने आणि वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

शुक्रवारी सकाळी ६ वाजता सांगोला बसस्थानकातून सुटलेली स्वारगेटकडे जाणारी बस (MH 11 BL 9281) साधारणपणे दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचणे अपेक्षित होते.

 मात्र, प्रत्यक्षात दुपारी २ वाजून गेले तरी बस मुक्कामी पोहोचली नव्हती. त्यामुळे ५-६ तासांचा प्रवास तब्बल ८ तासांवर गेला.

वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांची गैरसोय

दररोज कामानिमित्त पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांना या विलंबाचा मोठा फटका बसत आहे. बँक व्यवहार, रुग्णालयातील भेटी, 

शासकीय कामे तसेच व्यावसायिक बैठका यासाठी वेळेवर पोहोचणे कठीण होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

बसची अवस्था चिंताजनक

प्रवाशांच्या मते, बसची स्थिती अत्यंत खराब असून इंजिनमध्ये पुरेशी ताकद नसल्याने गाडी वेग घेत नाही. 

त्यामुळे संपूर्ण प्रवासात बस ‘कासवगती’ने धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रवाशांचा संताप व्यक्त

सांगोला येथील व्यापारी दीपक चोथे यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की,

“एसटीवर विश्वास ठेवून आम्ही प्रवास करतो, पण अशा निकृष्ट बसमुळे वेळ वाया जातो. गाडीचा वेग खूपच कमी आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.”

प्रशासनाकडून उपाययोजनांची अपेक्षा

खासगी प्रवासी सेवांशी स्पर्धा वाढत असताना एसटीची सेवा दर्जाहीन होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. 

सांगोला आगारातील अधिकाऱ्यांनी बसची तांत्रिक दुरुस्ती करून वेळेवर सेवा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, प्रशासन आता तरी या समस्येवर ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments