सांगोलेत रविवारी ‘नो रोड सेल’! आठवडा बाजारासाठी नगरपरिषदेचा कडक निर्णय
सांगोले | प्रतिनिधी सांगोले शहरातील आठवडा बाजार अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावा यासाठी नगरपरिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या दिवशी रस्त्यावर भाजीपाला विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
नगरपरिषदेकडून सांगण्यात आले की, बाजारासाठी पत्राशेड व बाजार आवारात पुरेशी जागा आणि व्यवस्थित सुविधा उपलब्ध आहेत.
त्यामुळे कोणत्याही शेतकरी किंवा विक्रेत्याने रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने बसू नये, असे ठाम आवाहन करण्यात आले आहे.
👉 नियम मोडल्यास थेट कारवाई!
रस्त्यावर विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईलच, पण बाजार परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहने थेट पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
👉 भीमनगरसमोर ‘नो वेंडिंग झोन’
भीमनगरसमोरील रस्ता हा फक्त पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आला असून, त्या ठिकाणी कोणत्याही विक्रेत्याला बसण्यास मनाई करण्यात आली आहे.
👉 गर्दी, चोरी आणि वाहतूक कोंडीवर लगाम
आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
तसेच रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतूक आणि पार्किंगमध्ये अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
🗣️ “नियम पाळा, सहकार्य करा!”
लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा गोरख माने आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी सर्व नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


0 Comments