वाढदिवशीच मृत्यूचा सापळा! रिलस्टार सोनाली जाधवचा प्रियकराकडून खून प्रेम,
संशय आणि खून! रिलस्टार सोनाली जाधव प्रकरणाने हादरला पंढरपूर
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे एका रिलस्टार महिलेचा अनैतिक संबंधातून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सोनाली नेताजी जाधव (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून,
तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.
सोनाली जाधव हिचा विवाह सुमारे १६ वर्षांपूर्वी झाला होता. ती विविध व्हिडिओ तयार करून
फेसबुक व इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होती आणि परिसरात रिलस्टार म्हणून ओळखली जात होती.
काही दिवसांपासून ती पतीपासून वेगळी राहून भोसे येथे माहेरी राहत होती.
याच काळात तिचे गावातील तुकाराम गावंधरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते.
मात्र, अलीकडे सोनाली दुसऱ्या व्यक्तीसोबत फिरत असल्याचा संशय आरोपीला आला होता.
याच रागातून ६ एप्रिल रोजी, सोनालीच्या वाढदिवशी ‘गिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला मोटारसायकलवरून बाहेर नेले.
त्यानंतर सोनाली दोन दिवस घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, रोपळे परिसरातील कालव्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
हा मृतदेह सोनालीचाच असल्याचे तिच्या वडिलांनी ओळख पटवली.
करकंब पोलिसांनी संशयित तुकाराम गावंधरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सोनालीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाढदिवसाच्या दिवशीच घडलेल्या या हृदयद्रावक प्रकारामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.


0 Comments