“सांगोल्यात धुराचे संकट! कडलास रोड कचरा डेपोला वारंवार आग; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू”
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील कडलास रोडवरील कचरा डेपो येथे
वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरपालिका प्रशासनाकडून घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करून तो कडलास रोड येथील डेपोमध्ये टाकला जातो.
मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याच्या साठ्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे. या कचऱ्यात ज्वलनशील पदार्थांचाही समावेश असल्याने वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.
या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुराचे मोठमोठे लोट परिसरात पसरत असून, नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ व इतर आरोग्य समस्या भेडसावत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असूनही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी वारंवार नगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्थानिक नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष नितीनआबा इंगोले म्हणाले,
“कचरा डेपोमध्ये लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत नगरपालिकेत बैठक घेण्यात आली असून, लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल.”
डॉ. परेश खंडागळे यांनीही प्रशासनाला इशारा देत सांगितले की,
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करू.”
स्थानिक नागरिक सुरज पठाण यांनी संताप व्यक्त करत म्हटले,
“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या समस्येला सामोरे जात आहोत. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आता तरी ठोस उपाययोजना करावी.”
👉 कडलास रोडवरील कचरा डेपोचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.


0 Comments