“सांगोल्यातील गँगवॉर प्रकरण तापले! ३३ वरून थेट ४० आरोपी; ७ जण फरार, पोलिसांवर प्रश्नचिन्ह”
प्रतिनिधी | सांगोला: सांगोला शहरातील महिला सूतगिरणीसमोरील मोकळ्या पटांगणात ३१ मार्च रोजी झालेल्या तुफानी मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले
असून, आधी ३३ आरोपींवर गुन्हा दाखल असताना तपासात आणखी ७ आरोपींची भर पडल्याने एकूण आरोपींची संख्या ४० वर पोहोचली आहे.
घटनेच्या दिवशी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यानंतर सांगोला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत
दोन्ही गटांतील ३३ जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले होते. मात्र, पुढील तपासात आणखी काही नावे समोर आली.
नवीन समाविष्ट आरोपींमध्ये मारुती सोसे (रा. शिवणे), प्रकाश बुरुंगले (रा. सोनलवाडी), आबा कुटे (रा. अचकदाणी), रावसाहेब चळेकर (रा. बागलवाडी),
प्रताप उर्फ गब्बर करचे (रा. पाचेगाव), नितीन आमुने (रा. नागज) आणि सचिन बोरकर (रा. किडेबिसरी) यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आरोपींच्या संख्येबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी या प्रकरणात ४ नवीन नावे वाढली
असल्याचे सांगितले, तर न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार ७ आरोपी वाढविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
👉 त्यामुळे “उर्वरित ३ आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का?” असा सवाल उपस्थित होत असून, शहरात या प्रकरणाबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
सांगोला पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.


0 Comments