तलावात काळाचा घाला: मुलांना वाचवताना आईसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील घटना..
मंगळवेढा (सोलापूर): मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावाजवळील साठवण तलावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
धुण्यासाठी गेलेल्या आईसह तिच्या दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
वैशाली अनिल घोडके (वय 35) या नेहमीप्रमाणे आपल्या मुलगी श्रेया (12) आणि मुलगा सोहम (10)
यांना सोबत घेऊन गावाजवळील तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, मुले तलावाजवळ खेळत
असताना अचानक पाय घसरून एक जण पाण्यात पडला. आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आईने तत्काळ तलावात उडी घेतली.
मात्र, पाण्याची खोली आणि गाळाचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
शोधकार्य आणि बचाव मोहीम
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
तलावाजवळ पडलेले कपडे व चपला पाहून परिस्थितीची गंभीरता लक्षात आली.
ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. काही वेळातच वैशाली घोडके यांचा मृतदेह सापडला, त्यानंतर परिसरात एकच आक्रोश पसरला.
तलावातील गाळ आणि खोलीमुळे मुलांचा शोध घेणे कठीण जात होते. त्यामुळे पंढरपूर येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.
अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर श्रेया आणि सोहम यांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
परिसरात हळहळ
आईने आपल्या लेकरांना वाचवण्याचा प्रयत्न करताना स्वतःचाही जीव गमावल्याने ही घटना अधिकच वेदनादायी ठरली आहे.
या घटनेने खडकी गावासह संपूर्ण मंगळवेढा तालुका शोकमग्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



0 Comments