सगेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर; दाखले,
योजनांचा लाभ एकाच छताखाली उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांच्या हस्ते
सांगोला (प्रतिनिधी):सांगोला तालुक्यातील सगेवाडी येथे दि. १७ एप्रिल २०२६ रोजी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेले “समाधान शिबीर” उत्साहात पार पडले.
हे शिबिर केवळ शासकीय कार्यक्रम न राहता, जनतेसाठी लोकसेवेचा उत्सव ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळ अधिकारी महेश जाधव, तलाठी, पुरवठा अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड दुरुस्ती, श्रावण बाळ योजना यांसारख्या विविध महत्त्वाच्या सेवांचा
लाभ नागरिकांना जागेवरच देण्यात आला. अनेक नागरिकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अडचणी या शिबिरामुळे मार्गी लागल्या.
शिबिरात आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून येत होता.
“शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे हे शिबिर ठरले.
या उपक्रमात अनुलोम संस्थेच्या वतीने जनसेवक कपिल नलावडे, महेश खांडेकर व युवराज लेंडवे यांनी सहकार्य केले.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजनांची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले, त्यामुळे जनतेचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला.
छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा जपत हे अभियान प्रशासन आणि जनतेतील नातेसंबंध अधिक घट्ट करणारे ठरले.


0 Comments