दारूच्या व्यसनाचा शेवट रक्तरंजित! बहिणीने पतीच्या मदतीने भावाचा गळा आवळून खून
करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील केम येथे आढळलेल्या एका संशयास्पद मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा अवघ्या २४ तासांत करत पोलिसांनी खळबळजनक सत्य समोर आणले आहे.
दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या सख्ख्या बहिणीनेच आपल्या पतीच्या मदतीने भावाचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
१२ एप्रिल २०२६ रोजी दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीजवळ मक्याच्या गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे (वय ३८) यांचा मृतदेह आढळून आला होता.
सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी मृताच्या बहिणी शितल राजू केंगारे आणि तिचा पती राजेश बापू केंगारे यांची चौकशी केली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सखोल चौकशी करण्यात आली असता शितलने गुन्ह्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी कांबळे याला दारूचे तीव्र व्यसन होते. ११ एप्रिलच्या रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन बहिणीशी वाद घालू लागला.
या सततच्या त्रासाला कंटाळून आणि रागाच्या भरात शितलने ओढणीने त्याचा गळा आवळला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शितल आणि तिचा पती राजेश यांनी मिळून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात नेऊन टाकला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोसई जाधव व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने करत आहेत.


0 Comments