धक्कादायक! मंगळवेढ्यात ‘नरबळी’चा संशय; १० फूट खड्डा, मांत्रिक आणि गूढ पूजाविधीचा उलगडा
मंगळवेढा | प्रतिनिधी मंगळवेढा शहरात नरबळीच्या अफवेने एकच खळबळ उडाली होती.
एका घरात तब्बल १० फूट खोल खड्डा खोदून गूढ पूजाविधी सुरू असल्याची माहिती समोर येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, या ठिकाणी बाहेरून आलेला मांत्रिक आणि नशेत असलेला एक तरुण आढळल्याने संशय अधिकच गडद झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात काही दिवसांपासून घरात गुप्तपणे खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच
त्यांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि पौर्णिमा जवळ आल्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला. ‘नरबळी’ दिली जाणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली.
घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ मंगळवेढा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. घरमालक, संबंधित मांत्रिक आणि अन्य व्यक्तींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणेही टाळले होते.
🔍 पोलिसांचा खुलासा
पोलीस तपासात मात्र मोठा खुलासा झाला आहे. हा प्रकार कोणत्याही ‘नरबळी’शी संबंधित नसून, गूढ पूजाविधीचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चौकशीनंतर संशयितांना सोडून देण्यात आले असून, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
⚠️ नागरिकांना आवाहन
अफवांमुळे भीती पसरवू नका, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


0 Comments