मानवतेला काळिमा! सोलापूर सिव्हिलमध्ये नवजात बाळाला सोडून आई-वडिलांचे पलायन
सोलापूर सिव्हिलमधील धक्कादायक प्रकार
सोलापूर : मानवतेलाही काळिमा फासणारी धक्कादायक घटना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उघडकीस आली आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर
अवघ्या एका दिवसातच नवजात बाळाला रुग्णालयात असुरक्षित अवस्थेत सोडून आई-वडील पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गा नागेश राऊळे आणि नागेश राऊळे (रा. हुमनाबाद, जि. बिदर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा राऊळे ही महिला गरोदर असल्याने प्रसूतीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती.
२० फेब्रुवारी २०२६ रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. त्यावेळी तिच्यासोबत पती नागेश राऊळे उपस्थित होता.
मात्र २१ फेब्रुवारी रोजी कोणतीही माहिती न देता दोघांनी नवजात बाळाला रुग्णालयातच सोडून पलायन केले.
काही वेळ बाळ एकटेच पडून होते. नंतर ते जोरात रडू लागल्याने हा प्रकार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.
कर्मचाऱ्यांनी परिसरात दोघांचा शोध घेतला; मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रसूतीशास्त्र विभागातील डॉ. स्वाती भोसले यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल मनोहर करीत आहेत.
कागदपत्रांची तपासणी झाली नव्हती
रुग्णालयात दाखल होताना कर्मचाऱ्यांनी संबंधितांकडे आधार कार्ड व रेशन कार्डची मागणी केली होती.
मात्र त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले. महिलेची प्रसूती तातडीची असल्याने औपचारिकता न करता तिला दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर मात्र दोघांनी बाळाला सोडून पलायन केले.
बाळाला पंढरपूर येथे पाठवले
प्राथमिक माहितीनुसार हे दाम्पत्य भटकंती करणारे असल्याचे समोर आले आहे. नवजात बाळाची योग्य देखभाल व्हावी यासाठी त्याला पंढरपूर येथे संगोपनासाठी पाठवण्यात आले
असून आरोपी आई-वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, अशी माहिती सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी दिली.


0 Comments