सांगोल्यात ‘परदेशी पाहुण्यांचे’ आगमन! बुद्धेहाळ तलावावर ५० हून अधिक राजहंसांचा थवा; पक्षीप्रेमींमध्ये उत्साह
सांगोला : सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावावर परदेशातून स्थलांतर
करून येणाऱ्या दुर्मिळ बार हेडेड गुज (परदेशी राजहंस) या पक्ष्यांच्या ५० हून अधिक थव्याचे दर्शन झाल्याने
पक्षीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगोला तालुक्यात एवढ्या मोठ्या संख्येने या पक्ष्यांची प्रथमच नोंद झाल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.
पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, प्रा. डॉ. विधीन कांबळे आणि प्रा. तानाजी यादव
हे बुद्धेहाळ तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेले असता त्यांना या परदेशी राजहंसांचा मोठा थवा दिसून आला.
तलाव परिसरात हवेत उडताना तसेच पाण्यात शिस्तबद्धपणे पोहत असलेले हे देखणे पक्षी पाहून निरीक्षकही भारावून गेले.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात आगमन
बार हेडेड गुज हे हिवाळी स्थलांतरित पक्षी असून ते प्रामुख्याने चीन, तिबेट, रशिया आणि मंगोलिया या थंड प्रदेशात आढळतात.
बर्फाळ हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी हे पक्षी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत भारतात स्थलांतर करतात.
या पक्ष्याच्या डोक्यावर असलेल्या विशिष्ट पट्टेदार रचनेमुळे मराठीत त्याला ‘पट्टकादंब’ असेही म्हटले जाते.
आकाराने मोठे असलेले हे पक्षी साधारण ६ ते ७ किलो वजनाचे असतात.
हिमालय ओलांडणारे शक्तिशाली उड्डाण
या पक्ष्यांची उड्डाण क्षमता अत्यंत विलक्षण मानली जाते. हे पक्षी हिमालय पर्वतरांगांवरून तब्बल ८ ते ९ हजार मीटर उंचीवरून उडत
भारतात येतात. मजबूत पंखांमुळे ते एका दिवसात जवळपास १६०० किलोमीटरचा प्रवास करू शकतात.
जलाशय परिसरात अधिवास
नद्या, तलाव, धरणांचे जलाशय हे या पक्ष्यांचे प्रमुख अधिवास आहेत. ते गवताचे अंकुर, बिया तसेच शेवाळ खाऊन उपजीविका करतात. भारतात
आसाममधील चिल्का सरोवर, राजस्थानमधील भरतपूर पक्षी अभयारण्य, महाराष्ट्रातील भिगवन, मायणी, वीर धरण परिसर या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात आढळतात.
जलाशयावर हवेत उडताना किंवा पाण्यात शिस्तबद्धपणे पोहताना या देखण्या पक्ष्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी वन्यजीव छायाचित्रकार मोठ्या संख्येने गर्दी करतात.
सांगोल्यासाठी पहिली मोठी नोंद
सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव परिसरात एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी
राजहंस आढळल्याची ही पहिलीच नोंद असल्याचे पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी सांगितले.
हे स्थलांतरित पक्षी मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा आपल्या मूळ देशांकडे परतीचा प्रवास सुरू करतात.
या अनोख्या पाहुण्यांच्या आगमनामुळे सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव परिसर आता पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.


0 Comments