पंढरपूर सांगोला रोडवर भीषण अपघात! मावशीला आणायला निघालेल्या २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; वृद्ध गंभीर जखमी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला-पंढरपूर रोडवर रविवारी सकाळी भीषण दुचाकी अपघात होऊन २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला
असून ७५ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सुरवसे वस्ती जवळ घडली.
मृत तरुणाचे नाव अभिजीत प्रकाश बाबर (वय २०, रा. तिसंगी, ता. पंढरपूर) असे असून
जखमी वृद्धाचे नाव इसीबलाल पैगंबर मुजावर (वय ७५, रा. मांजरी, ता. सांगोला) असे आहे. जखमीवर सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत बाबर हा आपल्या मावशीला आणण्यासाठी तिसंगी येथून एमएच-१३-ईएम-२२४४ या दुचाकीवरून
बामणी (ता. सांगोला) येथे जात होता. त्याचवेळी इसीबलाल मुजावर हे एमएच-४५-झेड-६४७४ या दुचाकीवरून मांजरीहून पंढरपूर रोडने आपल्या शेतातील घराकडे जात होते.
सुरवसे वस्ती जवळ मुजावर हे घराकडे वळत असताना मेथवडे फाट्याकडून येणाऱ्या अभिजीतच्या
दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत अभिजीत बाबर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्याला तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांनी तपासणी करून
त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. जखमी मुजावर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी सांगोला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार बजरंग बोराटे करीत आहेत.
➡️ परिसरात हळहळ:
तरुणाच्या अचानक मृत्यूमुळे तिसंगी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


0 Comments