प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! नाव-जात बदलून तरुणीची फसवणूक; संशयित तरुणाला नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नातेपुते : नाव, जात आणि धर्म लपवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवून
फसवणूक करणाऱ्या तरुणाचा अखेर भांडाफोड झाला असून नातेपुते पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणारी नातेपुते येथील २५ वर्षीय तरुणीची ओळख
पुण्यातच काम करणाऱ्या एका तरुणाशी झाली. स्वतःचे नाव दक्ष केशव वैद्य (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, सध्या बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे)
असे सांगत त्या तरुणाने बनावट ओळख निर्माण केली होती. आधार कार्ड व पॅनकार्डही त्याने याच नावाने तयार केल्याचा आरोप आहे.
मात्र प्रत्यक्षात त्याचे खरे नाव इक्बाल शेख (रा. टाकळीमिया, ता. राहुरी) असे
असून त्याने स्वतःला ब्राह्मण असल्याचे भासवून सप्टेंबर २०२५ पासून संबंधित तरुणीशी ओळख वाढवली. काही दिवसांतच मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
आरोपीने तरुणीच्या आई-वडिलांशी व नातेवाईकांशी संपर्क ठेवत विश्वास संपादन केला.
कोरोनाकाळात आई-वडील वारल्याचे सांगत, गावी सहा एकर बागायती शेती व घर असल्याचे खोटे सांगून लग्नासाठी दबाव टाकत होता.
दरम्यान, पुण्यातून आरोपीच्या पत्नीनेच तरुणीच्या आईला चार-पाच वेळा फोन करून सत्य परिस्थिती सांगितली.
त्यामुळे संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला. मुलीच्या भवितव्याचा विचार करून काही दिवस कुटुंबीयांनी शांतता राखली.
त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांची भेट घेत तक्रार दिली.
पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू करून १० मार्च रोजी आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी नातेपुते पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments