धडाकेबाज कारवाई! सांगोला पोलिसांनी ८५ गोवंशांची सुटका; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
सांगोला : सांगोला पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत गायरान जमिनीवर चारा-पाण्याविना
दाटीवाटीने बांधून ठेवलेल्या तब्बल ८५ गोवंशांची सुटका करत मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे
(मंगळवेढा विभाग) यांच्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
भीमनगर (ता. सांगोला) येथील गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात गायी-वासरे बांधून ठेवण्यात
आल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगोला पोलिसांनी पथकासह रात्री छापा टाकला.
रात्री सुमारे २.३० वाजता केलेल्या तपासणीत चिलारीच्या झुडुपांमध्ये खिलार, गिर व जर्सी जातींची
एकूण ८५ जनावरे चारा-पाण्याची कोणतीही सोय नसताना दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळली.
यामध्ये ४१ खिलार गायी, ८ खिलार कालवडी, २० खिलार खोंडे, ३ गिर गायी, २ गिर कालवडी,
७ गिर खोंडे व ४ जर्सी गायी अशी जनावरे मिळाली. या जनावरांची अंदाजे किंमत ७ लाख ६३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी मालकाबाबत चौकशी केली असता कोणतीही माहिती मिळाली नाही.
त्यामुळे सपोनि भारत वाघे यांनी पंचनामा करून सर्व जनावरे ताब्यात घेतली.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर येथील पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.
या घटनेची फिर्याद पोहेकॉ अनिल भिवा येडगे (सांगोला पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.
सांगोला पोलिसांच्या या कारवाईमुळे गोवंश तस्करी किंवा छळाच्या प्रकारांवर मोठा आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.



0 Comments