पालकमंत्री ना.जयकुमार गोरेंना घरच्या मैदानात धक्का!
माण पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता; सभापती-उपसभापती दोन्ही पदांवर बाजी
माण : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघातच भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
माण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवत सभापती आणि उपसभापती ही दोन्ही महत्त्वाची पदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे घरच्या मैदानातच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
माण पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम शिंगाडे, तर भाजपकडून अर्जुन काळे मैदानात होते.
निवडणुकीत दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच मते मिळाल्याने निकाल ‘ईश्वरी चिठ्ठी’वर गेला. चिठ्ठीत राष्ट्रवादीचे शिंगाडे यांच्या नावाला कौल मिळाल्याने ते सभापतीपदी विराजमान झाले.
उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही तितकीच चुरस पाहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या प्रियांका जगदाळे आणि भाजपचे डॉ. राजेंद्र खाडे यांना प्रत्येकी पाच मते मिळाली.
त्यामुळे पुन्हा एकदा ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली आणि त्यात जगदाळे यांच्या नावाला कौल मिळाल्याने उपसभापतीपदही राष्ट्रवादीच्या खात्यात गेले.
या निकालामुळे माण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी
दहा पंचायत समित्यांवर भाजपची सत्ता आणण्यात यशस्वी ठरलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मात्र स्वतःच्या मतदारसंघात पंचायत समिती गमवावी लागली आहे.
दरम्यान, निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य काही काळ अज्ञातस्थळी गेले होते. ते आज सकाळी थेट मतदानस्थळी दाखल झाले आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले.
जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री, खासदार आणि आमदार असतानाही राष्ट्रवादीने मिळवलेले हे यश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


0 Comments