अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील;
९ जूनपासून टेकऑफ, तिकीट विक्री सुरू; विमानसेवेचे वेळापत्रक जाणून घ्या.
सोलापूर:- तारीख पे तारीख देत अनेक वेळा पुढे ढकलेल्या सोलापूर विमानतळावरील नागरी विमानसेवेला एकदाचा मुहूर्त लागला.
विमानसेवा देणाऱ्या फ्लॉय ९१ कंपनीकडून मंगळवारपासून तिकीट विक्री सुरू करण्यात आली.
९ जूनपासून विमानसेवा सुरू होणार आहे. गोवा-सोलापूर या मार्गावर आठड्यातून चार दिवस विमानसेवा दिली जाणार असल्याची माहिती फ्लॉय ९१ चे वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष चिटणीस यांनी दिली.
फ्लॉय ९१ कंपनीच्या संकेतस्थळावर मंगळवारपासून सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर असे सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवसांचे वेळापत्रक व तिकिटांचे दर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
सोलापूर ते गोवा मार्गासाठी प्रारंभिक तिकीट दर दोन हजार ४७५ रुपये आणि ५ टक्के जीएसटी असे आहेत. या दरामध्ये मागणीनुसार वाढ होऊ शकते.
फ्लाय ९१ या कंपनीचा गोवा-सोलापूर हा भारतातील आठव्या क्रमांकाचा मार्ग आहे. एकूण आठ शहरापर्यंत गोव्यातून ही कंपनी विमानसेवा देते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, जळगाव,
सिंधुदुर्ग आणि आता सोलापूर यांचा समावेश आहे. या विमानसेवेमुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाला सोलापूरचे धार्मिक पर्यटन जोडले जाणार आहे.
सोलापूर येथील विमानसेवेमुळे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी गोवा जोडले जाणार आहे.
गोवा येथील भाविकांना सोलापूरला येण्याची तसेच सोलापूरच्या पर्यटकांना गोव्याला जाण्याची सुविधा या विमानसेवेमुळे निर्माण झाली आहे.
विमानसेवेचेवेळापत्रक
सोमवार व शुक्रवार
गोवा - सोलापूर
प्रस्थान सकाळी ७.२० आगमन सकाळी ८.३०
सोलापूर - गोवा
प्रस्थान सकाळी ८.५० आगमन सकाळी १०.०५
शनिवार व रविवार
गोवा - सोलापूर
प्रस्थान दुपारी ४.०५ आगमन सायंकाळी ५.१०
सोलापूर - गोवा
प्रस्थान सायंकाळी ५.३५ आगमन सायंकाळी ६.५०
सोलापूर केवळ महत्त्वाचे औद्योगिक केंद्र नाही, तर महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्र परिघामधील एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे.
आमच्या विमानसेवेमुळे यात्रेकरूंना तसेच व्यावसायिकांना आरामदायी विमानप्रवास करता येईल.
आमच्या कंपनीकडून सुरक्षित विमानसेवा पुरविली जाते.- मनोज चाको, व्यवस्थापकीय संचालक, फ्लॉय ९१, गोवा
सोलापूरच्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी दुपारी संकेतस्थळावर विमानसेवेची घोषणा होताच संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या बारा पटीने वाढली आहे.
पहिल्याच दिवशी सोलापूर मार्गावर तिकीट बुकिंगला प्रारंभ झाला आहे.- आशुतोष चिटणीस, वाणिज्य व्यवस्थापक, फ्लॉय ९१, गोवा 9000+ मॅगझीन्स एक्स्प्लोर करा
0 Comments