ब्रेकिंग न्यूज..सांगोला वन विभागातील पाणवठे पडले कोरडे ठाक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी तडफड पाहावयास मिळत आहे.
वन विभाग क्षेत्रातील अनेक पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे याच प्राण्यांचा वावर मानव वस्तीत वाढला आहे.वनविभाग मात्र कोणत्याच प्रकारची तसदी घेत नाही.
त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने पाणवट्यामध्ये पाणी सोडून वन्य प्राणी व पक्षी यांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जनतेमधून केली जात आहे.
सांगोला तालुक्यातील जुनोनी, नराळे, घेरडी, डिकसळ, कोळा, महूद, चिकमहुद, लोटेवाडी, शिवणे, कीडबिसरी, पारे, कटफळ, पाचेगाव, मेडशिंगी, आलेगाव, सोनलवाडी, बागलवाडी येथे
मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. साधारणपणे तालुक्यामध्ये 7 हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. यामध्ये वन्यप्राणी, पक्षी ही मोठ्या प्रमाणात आहेत. वनक्षेत्र परिसरात असलेल्या पाणवठ्यात पाणी सोडले जात नाही.
येथे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहेत. यांना पिण्यास पाणीच नसल्याने यांचा वावर मानव वस्तीत वाढलेला आहे. तालुक्यातील गावालगत असलेल्या फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात तरस, लांडगे, कोल्हे, हरीण, सायाळ, ससे यांच्यासह अन्य प्राणी आहेत.
तर चिमणी, मोर, लांडोर, कावळा, घार, चित्तूर यांना पिण्यास पाणी नाही. याकडे कोणीच लक्ष देत नाही. आता तर गावातील लोकांनाच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.
येथे वनविभाग काय करणार. तर सध्या ज्याठिकाणी पाणवठा आहे, त्या ठिकाणी दुचाकी जाऊ शकत नाही. तेथे हा विभाग पाणी कसे सोडणार? सगळे फॉरेस्ट जनावरांसाठी मोकळे आहे. येथील झाडे तोडल्याने वनराई नष्ट झाली आहे.
वनिकरण विभागात पाणवठा वन्यप्राण्यांसाठी खूप उपयुक्त आहे. पण येथे पाणी सोडले जात नाही. वनविभागाला बुक्का लावणारे अधिकारी अन् कर्मचारी आपल्याच धुंदीत आहेत.
वनपाल, वनरक्षक व वनमजूर वन विभाग कार्यक्षेत्रात कोण आहेत? हेच जनतेला माहीत नाही. फॉरेस्टमध्ये अनेक ठिकाणी झाडे तोडलेले बुडे अन् जळणाचे फेस पहावयास मिळत आहेत.
वनिकरणात वन्य प्राण्यांचे पाणवठे नावालाच आहेत. येथील पाणवठे कायमचे कोरडे असतात. हे वनमजूर, वनरक्षकाला माहीत आहे. त्यामुळे सध्या ज्याठिकाणी ही यंत्रणा आहे,
ती निरुपयोगी आहे. हे वनपरिक्षेत्र अधिकार्याला माहीत नाही का? अशा या गोष्टी हे करीत नसतील तर फॉरेस्ट हे काय राखणार, असा सवाल जनता करू लागली आहे.
सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्र आहे. वनरक्षकासह वनमजुरांच्या नेमणुका आहेत. पण हे कोठे असतात, हे समजत नाही. नुसत्या गाड्या अडवून वृक्षतोड थांबणार नाही. त्यासाठी जनतेत मिसळून कामे केली पाहिजेत. सध्या कडक ऊन यामुळे उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे.
अक्षरश: चिमणीस पिण्यासही पाणी नाही. येथे फॉरेस्टमधील पाणवठ्यांची अवस्था तर न पाहवणारी अशीच आहे. पण कर्तव्याची जाण नसलेला हा विभाग सांगोला तालुक्यात मनमानीप्रमाणे काम करीत आहे.
0 Comments