एक किलो सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेला प्रथमेश गणेश मंडले रा. पाचेगाव, ता. सांगोला
येथील कामगार अखेर जेरबंद; चोरलेले सर्व 1 कोटी 27 लाखांचे सोने फरासखाना पोलिसांनी केले हस्तगत
पुणे : केवळ चार महिन्यापूर्वी कामाला लागलेल्या कामगाराने लॉकर उघडून त्यातील १ किलो सोन्याची बिस्किटे घेऊन फरार झाला होता.
फरासखाना पोलिसांनी सातार्यापासून सोलापूर, विजापूर, विजयवाडा पर्यंत त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर १३ दिवसांनी सांगली जिल्ह्यातील जत येथे त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
त्याच्याकडून चोरलेले सर्व १ कोटी २७ लाख रुपयांचे १ किलो सोने परत मिळविण्यात आले आहे. प्रथमेश गणेश मंडले (वय १८, रा. पाचेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे या चोरट्याने नाव आहे.
सुहास सावंत (वय ३१, रा. शनिवार पेठ) यांची बुधवार पेठेमध्ये प्रिसियस रिफायनरी आहे. त्यांचे सोने चांदी शुद्ध करण्याचे दुकान आहे़. त्यांच्याकडे ३ कामगार ७ ते ८ वर्षापासून कामाला आहेत.
दिवाळी सणानिमित्त कामाची व्याप्ती वाढल्याने त्यांनी प्रथमेश मंडले याला चार महिन्यांपूर्वी कामास ठेवले होते. त्यांच्याकडे सोन्याचे दागिने तसेच सोन्याची लगड त्यांच्या सांगण्याप्रमाणे दागिने वितळवुन,
नंतर वितळविलेल्या लगडची शुद्धता पडताळणी करुन त्यांच्याकडच्या सोन्याचे भांडवलामधून शुद्ध सोने दिले जात असते. त्यासाठी त्यांच्या लॉकरमध्ये प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे १ किलो सोन्याची बिस्किटे ठेवलेली होती.
१६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता दुकान उघडल्यानंतर सर्व जण काम करत होते. दुपारी दीड वाजता प्रथमेश मंडले हा तब्येत ठीक नाही, डॉक्टरांकडून औषधोपचार घेऊन येतो, असे सांगून बाहेर गेला. बराच वेळ झाला तरी तो आला नाही.
त्याचा मोबाईलही बंद होता. मंडले काम करीत असलेल्या ठिकाणीचे दुकानामधील लॉकर उघडे दिसून आले. त्यातील १ किलो सोन्याची बिस्किटे दिसून आली नाही. त्यानेच चोरल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे यांना मार्गदर्शन करुन पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे व पोलीस अंमलदार यांची टीम तयार केली.
प्रथमेश मंडले याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने मोबाईल बंद करुन ठेवल्यामुळे तसेच तो राहण्याचे ठिकाण वारंवार बदलुन सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, विजापूर, आंध्र प्रदेशातील विजयवाडा या भागात फिरत होता.
पोलीस पथकही त्याचा शोध घेत त्याचा पाठलाग करत होती. अखेर सांगली जिल्ह्यातील जत येथे २९ ऑक्टोंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेले सोने काढून दिले. तसेच कोल्हापूर येथील कारागीर शकील बशीर मोमीन
(वय ४५, रा. छावा गल्ली, कोल्हापूर) यास काही सोने विक्री केले होते. त्या कारागीरास देखील १० नोव्हेबर रोजी अटक केली. त्याच्याकडून विकलेले सोने जप्त केले. अशा प्रकारे चोरीला गेलेले सर्व १ कोटी २७ लाख रुपयांचे १ किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे
यांच्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार कृष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी,
नितीन तेलंगे, गजानन सोनुने, नितीन जाधव, चेतन होळकर, अर्जुन कुडाळकर, तानाजी नांगरे, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, शशिकांत ननावरे, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे व मनिषा पुकाळे यांनी केली आहे.


0 Comments