google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..वेध विधान परिषदेचे..

Breaking News

खळबळजनक ..वेध विधान परिषदेचे..

खळबळजनक ..वेध विधान परिषदेचे.. 


लोकसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहे.त्या निवडणुकीत यश कसे मिळवायचे 

याविषयीची रणनीती ठरवली जातेय.या निवडणुकीचा लोकांशी ं संबंध येत नाही.

 विधानसभेतील आमदारमंडळी विधान परिषदेवरचे आमदार निवडणून देत असतात.ह्या निवडणुका राजकीय घोडेबाजारावरच चाललात.

या घोडेबाजाराची गणित सामान्यांना कळत नाहीत. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा सत्ताधारी महायुतीच्या विरोधातील कौल तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार्‍या अखेरच्या विधान 

परिषदेच्या 11 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत आपापल्या आमदारांची मते फुटू नयेत याचे सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे. विशेषत: शिंदे गट आणि अजित पवार गटाला आपापले

 आमदार सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या एक तृतीयांश म्हणजेच 27 जागा रिक्त असताना विधानसभेतून निवडून द्यायच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. 

विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी विधान परिषदेची ही अखेरची निवडणूक असेल. लोकसभा निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

 शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा मूळ राष्ट्रवादी वा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले आहेत.

महाविकास आघाडीला 150 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांतून आघाडी मिळाली. शिवसेना शिंदे गटाची कामगिरी तुलनेत बरी

 असली तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पार धुव्वा उडाला. यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. 

अजित पवारांबरोबर गेलेले 10 ते 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या सार्‍या घडामोडींमुळेच अजित पवार गटाने आपल्या आमदारांची बैठक बोलावून

 खुंटा बळकट करण्याचा प्रयत केला. दुसरीकडे, शिंदे गटाच्या आमदारांमध्येही त्यांच्या भवितव्याबद्दल चिंता आहे. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असते.

 विधानसभेसाठी आपली उमेदवारी पक्की करण्याकरिता बंडाच्या पवित्र्यात असलेले आमदार पक्षाच्या विरोधात मतदान करू शकतात. याचा खरा धोका हा अजित पवार गट आणि शिंदे गटाला अधिक आहे.

दोन्ही पक्षातील कुंपणावरील आमदार विरोधात मतदान करू शकतात. याबरोबरच काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न महायुतीकडून होऊ शकतात. 

यामुळेच भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे व शिंदे गट, राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार गट यापैकी कोणत्याही पक्षांचे आमदार विरोधी मतदान करू शकतात. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अखेरची संधी असल्याने आमदार मंडळी आपले ‘हात ओले’ करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतांची फाटाफूट किती होते 

यावरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे.

 भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिवसेना शिंदे गट दोन तर अजित पवार गटही प्रत्येाकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. 

याचाच अर्थ महायुती 9 जागांसाठी प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. 

पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो. शेकापचे जयंत पाटील हे नेहमीच पुरेशी मते नसतानाही निवडून येण्याचा ‘चमत्कार’ करतात.

यंदा ते चमत्कार करणार का, याचीही उत्सुकता आहे. विधानसभेच्या 14 जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी 10 जागा या आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त आहेत. 

चार जागा या आमदारांच्या निधनाने रिक्त आहेत. परिणामी 274 सदस्यांमधून 11 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. जागा कमी झाल्याने निवडून येण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 23 मतांची आवश्यकता असेल.

वास्तविक पाहाता विधान परिषदेवर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पाठवायचे असते.त्यात कला,क्रीडा,संगीत,शिक्षण व सामाजिक अशा क्षेत्रात काम करणार्‍यांना संधी द्यावी असे संकेत आहेत 

पण हे संकेत पायदळी तुडवून धनवान लोकांना उमेदवरी देण्याचा पायंडा पडला आहे.याला कुठलाही पक्ष अपवाद नाही.हे धनवान लोक वाट्टेल तेवढा पैसा खर्च करून आमदारकी मिळवत असतात.

विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असते.कुणी कुणाला मत दिले हे कळत नाही.त्यामुळे घोडेबाजारात कोण कोण नाचले हे मात्र कळत नाही.त्यामुळे घोडेबाजाराला ऊत येत चालला आहे.

Post a Comment

0 Comments