खळबळजनक ..प्रत्येक शेतकरी हा भविष्यात करोडपती होणार - शेकाप नेते आमदार जयंत पाटील
प्रत्येक शेतकरी हा भविष्यात करोडपती होणार आहे. साधारणतः एकरी 60 कोटी एवढा भाव मिळणार आहे.
आपण या तिसर्या मुंबईच्या विकासाचे भागीदार होणार आहोत, शेकाप नेते जयंत पाटील
मुंबई / भविष्यात तिसरी मुंबई आपल्या जिल्ह्यात होऊ पाहात आहे, त्यामुळे आपल्याला जमिनी विकायच्या नाहीत.
प्रत्येक शेतकरी हा भविष्यात करोडपती होणार आहे. साधारणतः एकरी 60 कोटी एवढा भाव मिळणार आहे.
आपण या तिसर्या मुंबईच्या विकासाचे भागीदार होणार आहोत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
पेण येथील सार्वजनिक विद्या मंदिर येथे पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आयोजित बैठकी प्रसंगी आमदार जयंत पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पी.डी. पाटील, शेकाप चिटणीस तथा मा. सभापती महादेव दिवेकर, मा. नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, प्रकाश शिंगरुत, अशोक देसाई, प्रल्हाद पाटील, स्मिता पाटील
आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आ. पाटील यांनी याविषयी सविस्तर मार्गदर्शन शेकापचे युवा नेते तथा मास्टर ऑफ आर्किटेक्ट अतुल म्हात्रे हे करतील,
असे समस्त कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानुसार अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, भूमीपुत्र हा विकासाचा केंद्रबिंदू होणार नाही तर तो विकासाचा भागीदार होईल.
कारण मुंबई, नवी मुंबई येथून भूमीपुत्र शेतकरी विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकला गेला आहे. त्यामुळे भविष्यात होणार्या तिसर्या मुंबईसाठी खर्या अर्थाने शासनाची पावले पुढे पडायला सुरुवात झाली आहे.
पनवेल, पेण, खालापूर या विभागात एमएमआरडीए आपले जाळे पसरु लागले आहेत. या बाबीकडे वेळीच लक्ष दिले नाही
तर मुंबई आणि नवी मुंबई येथील भूमीपुत्रांसारखी अवस्था आपल्या रायगडच्या भूमीपुत्रांची होईल. मला अभिमान आहे की, आम्ही रायगडवासियांनी तब्बल 18,500 एमएमआरडीए विरुध्द हरकती नोंदविल्या आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, अटल सेतूमुळे रायगड जिल्हा मुंबईच्या अतिशय जवळ आला आहे. त्यामुळे अनेक गूंतवणुकदारांचे लक्ष रायगडातील जमिनींकडे लागलेले आहे. पूर्वी उरण, पेणमध्ये सेझसाठी भूसंपादन होत होते.
परंतु, येथील स्थानिक नेतृत्वाने भूसंपादनाला विरोध करून सेझ प्रकल्प रद्द केला. परंतु, आत्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून पुन्हा एकदा गूंतवणूकदारांसाठी जमिनी संपादन करण्याचा शासनाचा डाव आहे.
परंतु, या पुढे शासनाच्या प्रकल्पाला शेतकरी जमिनी देणार नाहीत तर त्या प्रकल्पात शेतकरी भागिदार होतील.
खारेपाटामध्ये दुबईसारखे एखादे शहर उभे करता येईल. परंतु, त्या विकासामध्ये शेतकरी वाटेकरी असणार. पेण तालुक्याच्या पूर्व विभागात भोगावती नदीच्या दोन्ही बाजूला उत्तम अॅग्रो पर्यटन उभे करता येईल.
आणि पर्यटनाला चालना देता येईल, तसेच पेण येथील अंतोरा बंदराचा व्यापार हा इजिप्तपर्यंत पोहोचला होता. ते बंदर पुन्हा योग्यप्रकारे उभारता येईल.
पेण हे गाव शैक्षणिक हब करता येईल. पेण हे कोकणातील पुणे असल्याने भविष्यात पेणचा विकास होत असताना भूमीपुत्र हा त्या विकासाचा भागीदार असेल, असेही म्हात्रे यांनी सांगितले.
0 Comments