माढा लोकसभा मतदारसंघात नाईक-निंबाळकर विरुद्ध मोहिते-पाटील
यांच्यात चुरशीची लढत उंटावरून मिरवणूक काढलेले खा. रणजितसिंह निंबाळकर थेट जमिनीवर
सांगोला :माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान एक दिवसांवर आले असून गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा काल सायंकाळी संपला
असून भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यामध्ये असलेली ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात प्रचारात
जोरदार झालेली असून वीस दिवसांपूर्वी कोण सांगितले असते की? रणजितसिंह निंबाळकर यांची भाजपाची ही जागा धोक्यात आहे? तर कोणीही विश्वास ठेवला नसता,
परंतु आजच्या घडीला मोहिते- पाटलांच्या उमेदवारीमुळे भाजपची येथील जागा नक्कीच धोक्यात आल्याचे चित्र माढा लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
सन २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासाठी मोहिते-पाटील कुटुंबीयांनी मत मागितले होते. निंबाळकर यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता,
परंतु २०२४ च्या निवडणुकीत निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवून निवडणूक मोठ्या रंगतदार स्थितीत आलेली आहे.
एका बाजुला मोहिते-पाटील कुटुंबाची असलेले एकूणच माढा लोकसभा मतदारसंघातील वलय सोबत शरद पवार यांची खंबीर साथ तर दुसऱ्या बाजूला निंबाळकर यांच्यासोबत असलेली
भाजपची तसेच महायुतीची ताकद यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतपधान नरेंद्र मोदीपासून ते नितीन गडकरी,
देवेंद्र फडणवीस पर्यंत सर्वांनी प्रचार केला तर इकडे मोहिते-पाटील यांचेसाठी शरद पवार यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या त्यामुळे या निवडणुकीत आज तरी नेमक कोण निवडून येईल सांगता येत नाही.
खा. रणजीतसिंह निंबाळकर यांचा ठराविक लोकांत असलेला वावर, थेट संपर्क नसल्याचा अभाव यामुळे मतदारसंघात असलेली नाराजी यामुळे
खा. रणजीतसिंह निंबाळकर यांची सर्व भिस्त ही सर्व विद्यमान आमदार यांच्या वरती आहे तर मोहिते-पाटील यांच्या कुटुंबाचा करिष्मा, जिल्ह्यातील नेत्यांबरोबर असलेले जुने संबंध,
सोबत शरद पवार यांची असलेली भक्कम साथ यामुळे निवडणूक मध्ये कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, मोहिते-पाटील यांच्या अस्तित्वाची तर भाजपाच्या प्रतिष्ठेची लढत झाली
असून एकतर्फी वाटत असलेली ही लढत शेवटच्या टप्प्यामध्ये अटीतटीची झाली असल्याने यामध्ये दोघांपैकी कोणीही विजय होऊ शकतो अशीही चर्चा या निमित्ताने माढा लोकसभा मतदारसंघात सुरू आहे.
ज्या खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची सांगोला तालुक्यातील लोकांनी पाणी आणले म्हणून उंटावरून मतदारांनी आता निंबाळकर यांना उंटावरून थेट जमिनीवरून
आणून ठेवल्याने “मतदार राजा” हा “राजाच” असतो त्याच्या मतांमध्ये किती ताकत असते प्रचिती सध्या
माढा लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे. ग्रामीण भागात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कमी वेळेत मतदारापर्यंत पोहचल्याने त्याचा फटका कोणाला बसणार? तसेच शरद पवार यांच्या
विषयी निर्माण झालेली सहानुभुती याचाही मोठा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. विशेष म्हणजे सर्व आमदार एका बाजूने तर जनता एका बाजूने अशी परिस्थिती
ही अनेक ठिकाणी झाल्याने सत्ताधाऱ्यां विरोधात असलेला रोष तसेच बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, दुधाचे कमी झालेले
दर यापासून ते अनेक मुद्द्यांचा उल्लेख या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांकडून केला गेला, परंतु माढा लोकसभा मतदारसंघातील एकतर्फी वाटत असलेली
भाजपसाठीची ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात अटीतटीची झाल्याने त्याचा फटका नेमका कोणाला बसणार हे मतदाना नंतर स्पष्ट होईलच. अटीतटीची लढत असल्याने शेवटच्या टप्प्यात लक्ष्मी दर्शन ही सुरु असल्याचे बोलले जात आहे.
0 Comments