सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; पतीची आत्महत्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : कौटुंबिक वादातून पतीने खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यात मारून पत्नीचा खून केला आणि स्वतः शिव बाभळीच्या फांदीला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास (कटफळ, ता. सांगोला बंडगरवस्ती) येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.
मंडाबाई श्रीमंत मिसाळ (वय ५४),श्रीमंत मारुती मिसाळ (वय ५८, दोघेही रा. कटफळ, बंडगरवस्ती, ता. सांगोला) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
याबाबत बाळासाहेब मारुती मिसाळ यांनी पोलिसात खबर दिली आहे. श्रीमंत मिसाळ यांना दोन पत्नी असून पहिल्या पत्नीला मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी दुसरे लग्न केले होते.
खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यात घातला घाव
पहिली पत्नी शेतात राहत होती, तर दुसरी पत्नी त्यांच्या शेतापासून दीड किमी अंतरावर राहत होती. पहिल्या पत्नीला दम्याचा त्रास होत होता.
दवाखान्याच्या खर्चामुळे पती-पत्नीत कौटुंबिक वाद होत होता. या वादातून पती श्रीमंत मिसाळ यांनी खोऱ्याच्या तुंब्याने पत्नीच्या डोक्यात मारल्याने ती बेशुद्ध अवस्थेत घरात पडली होती.
दरम्यान आपल्या हातून पत्नीचा खून झाला या भीतीने पतीने घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीवरील शिव बाभळीच्या झाडाच्या फांदीला सुताच्या दोरीने गळफास घेतला.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सहायक पोलिस निरीक्षक २ 3 भारत वाघे, पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूला चौकशी,
विचारपूस केली तसेच ठसे तज्ज्ञांकडून घटना स्थळाची तपासणी केली तर फारेन्सिक पथकाने बहुतेक पुरावे गुन्ह्यांच्या पुढील तपासकामी ताब्यात घेतले.


0 Comments