सोलापूर जिल्ह्यातील घटना...केस कापण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूचे रहस्य अनाकलनिय !
केस कापायला म्हणून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा मृत्यू हे एक कोडे बनले असून आता पोलिसांच्या तपासातच हे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
पोलीस या घटनेच्या तपासाला लागलेले असून त्यांच्या तपासात काय निष्पन्न होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक आणि रहस्य निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
मोहोळ तालुक्यातील रानमसले गावातील २३ वर्षे वयाचा, लखन पांडुरंग गरड हा तरुण, केस कापून येतो म्हणून घरातून बाहेर पडला. आणि त्यानंतर पुढे जे समोर आले ते अत्यंत धक्कादायक होते.
केस कापायला गेलेला लखन घरी परत आलाच नाही त्यामुळे घरात देखील चिंता व्यक्त होऊ लागली होती. काही वेळ वाट पाहिली पण लखन घरी आला नाही की त्याचा काही फोन देखील आला नाही.
लखनचा भाऊ अक्षय याने लखन याला फोन केला पण त्याने तो फोन उचललाच नाही, तो फोन उचलला तो थेट रेल्वे पोलिसांनी ! हा फोन रेल्वे पोलिसांनी उचलला आणि वडवळ रेल्वे पुलाखाली या असे अक्षयला सांगण्यात आले.
यामुळे कुटुंबाला धक्का बसला आणि काहीतरी अप्रिय घडले असल्याचा अंदाज त्यांना आला. कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकलेलाच होता पण नेमके काय घडलेय याची माहिती नव्हती.
लखनचे वडील पांडुरंग गरड हे घाइघाइने वडवळ रेल्वे पुलाकडे धावले आणि तेथे गेले असता त्यांना धक्का बसला. त्यांचा मुलगा लखन हा जखमी अवस्थेत रेल्वे रुळाच्या बाजूला पडलेला होता.
रेल्वे पोलिसांनी व वडील पांडुरंग यांनी रुग्णवाहिकेतून लखनला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
पोलिसांनी या घटनेची नोंद केली असली तरी, नेमका हा मृत्यू कसा झाला ? याचे अनेकांना कोडे पडले आहे. केस कापायला गेलेला लखन वडवळ रेल्वे पुलाच्या खाली कशासाठी गेला ?
त्याचा मृत्यू नेमका कसा झाला ? हा काही अपघात आहे की घातपात आहे ? असे अनेक प्रश्न त्याच्या मृत्युच्या भोवती गूढ निर्माण करीत आहे. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातच मिळण्याची शक्यता आहे.
0 Comments