google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना....न्यायालयातून वकील पती पत्नीचे अपहरण करून केली हत्या !

Breaking News

खळबळजनक घटना....न्यायालयातून वकील पती पत्नीचे अपहरण करून केली हत्या !

 खळबळजनक घटना....न्यायालयातून वकील पती पत्नीचे अपहरण करून केली हत्या !


 वकील असलेल्या पती पत्नीचे अपहरण करून त्यांचा खून करून टाकल्याची एक मोठी घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसर हादरून गेला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव हे दोघेही वकिली करीत होते. न्यायालयीन कामकाजासाठी ते दोघेही न्यायालयात आलेले असताना, गुरुवारी दुपारी ते दोघेही अचानक बेपत्ता झाल्याचे दिसून आले.

 त्यांच्या बेपत्ता होण्याने वकील वर्गात एकच खळबळ उडाली आणि शोधाशोध सुरु झाली. हे दोघेही सापडत नाहीत म्हटल्यावर तातडीने पोलिसांकडे धाव घेण्यात आली.

 पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलिसांनी तातडीने आढाव पती पत्नीचा शोध सुरु केला. वकील संघटनेने देखील पोलीस अधिकारी यांची भेट घेवून तातडीच्या तपासाची मागणी केली.  

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहणारे हे वकील कुटुंब अशा प्रकारे अचानक बेपत्ता झाल्याने परिसर हादरून गेला होता. पोलिसांनी मात्र वेगाने त्यांचा तपास सुरु केला होता. पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली. 

पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच मध्यरात्री पोलिसांना आढाव यांची कार दिसून आली. राहुरी न्यायालयाच्या परिसरात त्यांची गाडी बेवारस स्थितीत पोलिसांनी पहिली.

 मध्यरात्री पोलीस गस्त घालत असताना त्यांना ही गाडी दिसली. पोलीस या गाडीची तपासणी करू लागले असताना, राहुरी न्यायालयाच्या परिसरात आणखी एक गाडी आली 

परंतु तेथे असलेल्या पोलिसांना पाहताच ती गाडी तेथून वेगाने निघून गेल्याची एक घटना घडली. दरम्यान पोलिसांनी कारची तपासणी केल्यावर गाडीत  एक हातमोजा, दोर, मोबाईलचे कव्हर आणि एक बूट आढळला. 

 हे पाहून  पोलिसांची शंका अधिक बळावली. पोलिसांनी अधिक बारकाईने तपास सुरु केला,

 न्यायालयाच्या परिसरात बारकाईने पाहणी केली. यावेळी आढाव यांची दुचाकी न्यायालयाच्या मागील बाजूस उभी असल्याचे दिसले.

 यावरून आढाव आणि त्यांच्या पत्नीचे अपहरण झाल्याबाबत पोलिसांची शंका बळावली. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आणि पोलिसांचा हा अंदाज खरा ठरला. 

दरम्यान, पोलिसांना पाहून तेथून पळून गेलेल्या कारचा देखील शोध घेण्यात येत होता. पोलिसाच्या पथकाने या कारचा शोध घेतला. या कार मधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिसांनी त्यांना बोलते केले. 

सुरुवातीला  उडवाउडवी करण्यात आल्यानंतर त्यांनी मोठी माहिती पोलिसांना दिली. वकील पती पत्नीचा खून करून त्यांना राहुरी येथील उंबरे गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या एका विहिरीमध्ये त्यांना टाकून दिले 

असल्याचे त्यांनी सांगितले. वकील पती पत्नीचा खून करून त्यांच्या मृतदेहांना मोठे दगड बांधून त्यांना एका विहिरीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या विहिरीकडे धाव घेतली आणि विहिरीतील पाण्याचा उपसा सुरु केला.

  पाणी उपसा करून दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. या घटनेत पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून यात आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

 सदर दोघे घटनेनंतर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  पोलीस अधिक तपास करीत असून, ही घटना मनीषा आढाव यांच्या माहेरील मालमत्तेच्या वादातून घडली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.  

भर न्यायालयातून वकील पती पत्नीचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्याचा पर्यंत करण्यात आला. या घटनेने नगर जिल्हा हादरला असून, वकीलात देखील संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments