सांगोल्याच्या समाधान काशिद यांचे २० एकरावर डाळिंब लागवडीचे
आदर्श नियोजन शेतकरी नियोजनपीक ः डाळिंब
शेतकरी ः समाधान भीमराव काशिद एकूण क्षेत्र ः २७ एकर
डाळिंब क्षेत्र ः २० एकर
सोलापूर जिल्ह्यातील सोनंद (ता. सांगोला) येथे समाधान भीमराव काशिद यांची २७ एकर शेती आहे.त्यात २० एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड आहे. उर्वरित क्षेत्रावर कलिंगड, खरबूज, मका इत्यादी पिकांची लागवड आहे. समाधान काशिद हे गेल्या १७ वर्षांपासून डाळिंब शेती करत आहेत. डाळिंब बागेत आंबिया बहारातून उत्पादन ते घेतात.
संपूर्ण डाळिंब लागवडीची त्यांनी तीन भागांमध्ये विभागणी केली आहे. त्यात एकूण ७००० झाडे आहेत. त्यापैकी सात एकर क्षेत्रावरील २२०० झाडे असून ही लागवड २०१० मध्ये केली आहे. त्यातील प्रत्येक झाडापासून साधारण ३० किलोपर्यंत डाळिंब फळांचे उत्पादन मिळते. तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये २०२१ रोजी १८०० झाडांची लागवड केली आहे.
या लागवडीतून साधारण १० ते १५ किलोपर्यंत उत्पादन मिळते. या दोन्ही लागवडी १४ बाय ९ फूट अंतरावर केल्या आहेत. त्याशिवाय नव्याने यावर्षी एप्रिल महिन्यात ७ एकरांत ३ हजार झाडांची १३ बाय ९ फूट अंतरावर लागवड केली आहे.
बहार नियोजन ः
- यावर्षी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लागवड केलेल्या १२ एकरांतील बागेमध्ये आंबिया बहाराचे नियोजन केले आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपूर्वी बाग ताणावर सोडली होती.
- ताण कालावधीत बागेची छाटणी करून घेतली.
- बागेच्या विश्रांतीच्या काळात ०ः५२ः३४ आणि ०ः०ः ५० आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच संजीवकांच्या फवारण्या केल्या. शिवाय एक टक्का बोर्डो मिश्रणाच्या तीन फवारण्या केल्या आहेत.
- मार्च महिन्यात चरी काढून झाडांना एकरी ४ ट्रॉली शेणखत तसेच डीएपी ३०० ग्रॅम, मॅग्नेशिअम सल्फेट १०० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम, निंबोळी पेंड अर्धा किलो, आणि बोनमिल अर्धा किलो प्रति झाड प्रमाणे मात्रा दिल्या. तसेच बोर्डो पेस्ट लावून घेतली.- त्यानंतर १० एप्रिलच्या दरम्यान बागेची छाटणी करून बोर्डोची एक फवारणी केली.
- साधारण २७ एप्रिलच्या दरम्यान पाच तास सिंचन करून बागेचा ताण तोडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी इथ्रेल आणि ०ः५२ः३४ यांची स्टीकरसह फवारणी केली.
शेतकरी नियोजन : डाळिंब मागील कामकाज ः
- बागेतील झाडांचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी सातत्याने निरिक्षण करत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या. कळी निघण्यास सुरवात झाल्यानंतर थ्रीप्सचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेतली.
- पावसामुळे बागेत तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. तणनियंत्रण करून बागेची स्वच्छता केली.- पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होण्यासाठी ठिबकद्वारे शिफारशीत द्रावण सोडले.- आठवड्यातून दोन वेळा विद्राव्य खतांच्या मात्रा ठिबकद्वारे देत आहे.
- वाफसा पाहून दोन दिवसाआड दोन तास ठिबक संच चालू केला जातो.वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. कधी पाऊस, कधी उन्ह, तर कधी ढगाळ हवामान अशी स्थिती आहे. त्यामुळे बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या आहेत.
- सध्या बहार धरून चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. झाडांना १५० ते २५० ग्रॅम वजनाची फळे लागली आहेत.
- वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे फळे खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी फळांना कागद लावले जातात. त्यामुळे फळांचे संरक्षण होते. तसेच फळाला एकसारखा रंग येऊन चकाकी येते. कीड-रोगांपासून काही प्रमाणात फळांचा बचाव होतो वेळापत्रकानुसार रासायनिक खते, सेंद्रिय खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातील. त्यासोबतच करंज पेंडचा वापर करणार आहे.
- मागील काही दिवसांपासून पावसात उघडीप आहे. त्यामुळे उष्णता अधिक जाणवत आहे. त्यामुळे बागेची पाण्याची गरज वाढते. त्यासाठी जमिनीतील ओलावा आणि झाडाची पाण्याची गरज यांचा अंदाज घेऊन गरजेनुसार ठिबकचा कालावधी वाढविला जाईल.
- समाधान काशिद, ९८६००४९५९५
(शब्दांकन- सुदर्शन सुतार)
0 Comments