google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'महाविकास'ची वज्रमूठ सैल! जिल्ह्यात 'या' ७ मतदारसंघात भाजपा महायुतीच स्ट्राँग; ३ विद्यमान आमदारांना मेहनत घ्यावी लागणार

Breaking News

'महाविकास'ची वज्रमूठ सैल! जिल्ह्यात 'या' ७ मतदारसंघात भाजपा महायुतीच स्ट्राँग; ३ विद्यमान आमदारांना मेहनत घ्यावी लागणार

 'महाविकास'ची वज्रमूठ सैल! जिल्ह्यात 'या' ७ मतदारसंघात भाजपा महायुतीच स्ट्राँग;


३ विद्यमान आमदारांना मेहनत घ्यावी लागणार

सोलापूर : भाजपला डावलून २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत शिवसेनेने सरकार स्थापन केले. त्यानंतर ज्या मित्र पक्षाने निवडणुकीनंतर दगा दिला, तोच पक्ष फोडला आणि अडीच वर्षानंतर भाजप सत्तेवर आला.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची वज्रमूठ आता राज्यभर दौरे करून भक्कम होईल, असे वाटत असतानाच भाजपने राष्ट्रवादीला फोडून महाविकास आघाडीला दुसरा झटका दिला आणि त्यांची वज्रमूठ सैल केली.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असून कोण कोणत्या पक्षात आहे, हे कळायला मार्ग नाही. 

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी ग्रामीणच्या तुलनेत शहरात एकटेच ताण काढत असल्याचे चित्र आहे. महायुतीच्या वज्रमूठीमुळे आता महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आपण कसे निवडून येवू, याचेच नियोजन करीत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या एकमेव आमदार आहेत. महाविकास आघाडीला जिल्ह्यातील ११ पैकी १० मतदारसंघात आपली ताकद दाखवावी लागणार आहे. 

पहिल्यांदा दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता आहे. त्यानंतर लोकसभा व शेवटी विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. ११ आमदार व दोन खासदार असलेल्या सोलापूर जिल्ह्याकडे अद्याप उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्यांचे फारसे लक्ष दिसत नाही.

सध्या राज्यात दोन शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन गट असतानाही सत्तेत असलेल्यांकडेच सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना

 सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात सभा, बैठका घ्याव्या लागतील, अन्यथा निकाल वेगळा येवू शकतो, अशीही चर्चा आहे. बीआरएसचे नवे आव्हान, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचे दौरे, रयत क्रांती,

 स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व माकप, आप, एमआयएम हे सध्या कोणासोबत आहेत, हे स्पष्ट नाही. या संधीचा फायदा महाविकास आघाडी कितपत घेईल, त्यावर देखील काही मतदारसंघातील यश- अपयश अवलंबून असणार आहे.

जिल्ह्यातील ७ मतदारसंघात पुन्हा महायुतीचेच आमदार?

मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील, माढ्यात आमदार बबनराव शिंदे, माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते-पाटील, शहर उत्तरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, 

बार्शीत आमदार राजेंद्र राऊत आणि अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची ताकद निर्णायक आहे. त्याठिकाणी महाविकास आघाडीला सहजासहजी यश मिळणे कठीणच, अशी स्थिती आहे.

तीन विद्यमान आमदारांना ताण काढावा लागणार

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सुभाष देशमुखांचीही ताकद मोठी आहे, पण सद्य:स्थिती पाहता त्यांना थोडासा ताण काढावा लागणार, हे निश्चित. 

सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांना मानणारा वर्ग त्यांच्या मतदारसंघात मोठा आहे, पण विजयासाठी त्यांना स्थानिक नेत्यांशी जुळवून घेऊन बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल, अशी स्थिती आहे.

Post a Comment

0 Comments