सुसाइड नोट व्हायरल करून बेपत्ता झालेले माजी जि.प. सदस्य सापडले; दोन दिवसांनंतर सातारा जिल्ह्यातून घेतले ताब्यात
मला व माझ्या पत्नीला फसविले आहे. मी यातून सावरू शकत नाही. त्यामुळे मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियावर १५ मे रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास व्हायरल करून बेपत्ता झालेले भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य बाळासाहेब राजाराम माळी अखेर दोन दिवसांनंतर सापडले.
सातारा जिल्ह्यातील एका मठातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे.
या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून पंढरपूर येथील तानाजी कोळी आणि बाळासाहेब माळी यांचे पुतणे प्रदीप माळी हे कामकाज पाहत होते. या दोघांनी आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा घोटाळा करत एक कोटी एकवीस लाखांचा अपहार केला असल्याची सुसाइड नोट बाळासाहेब माळी यांनी सोमवारी (दि.१५) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली.
तानाजी कोळी यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीला आणि दमबाजीला कंटाळून मी कुटुंबासह आत्महत्या करत आहे, मी खूप लांब आलो आहे,
मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, असा संदेश व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर करकंब पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश तारू यांनी एक पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली होती.
दोन दिवसांच्या तपासानंतर सातारा जिल्ह्यातील गोंदवलेकर महाराज मठासमोर ते मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन करकंब येथे हजर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


0 Comments