धक्कादायक माहिती.. गरीब शेतकऱ्याने उडवली महाराष्ट्राची झोप, केली धक्कादायक मागणी !
वर्षानुवर्षे शेतकरी अडचणीत अडकून पडला आहे पण एक गरीब शेतकऱ्याने मात्र अवघ्या महाराष्ट्राचीच झोप उडवली आहे. गांजाची शेती करू द्या किंवा किडनी तरी विकण्याची परवानगी द्या', अशी मागणी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आहे.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र सतत विवंचनेत आणि कुठल्या न कुठल्या संकटाचा सामना करीत असतो. निवडणूक आली की सगळ्यांना या बळीराजाची आठवण येते, शेतकरी आत्महत्येचा पुळका येतो आणि मोठमोठ्या घोषणा केल्या जातात.
सरकारे बदलत राहतात पण शेतकऱ्याची अवस्था मात्र कधीच बदलत नाही आणि निवडणुकीत दिलेल्या घोषणा, निवडून आल्यावर लक्षातही राहत नाहीत अशी राज्यातील परिस्थिती कायम आहे. शेती कसणे जिकीरीचे झाले असतानाच निसर्गाचा फटका ठरलेला असतो.
काही शेतकरी गांजा लागवड करण्यासाठी परवानगी मागताना दिसतात. देशात गांजा उत्पादनास कायद्याने मनाई असल्यामुळे अशी परवानगी मिळण्याचा प्रश्नच येत नाही पण यातून शेतकऱ्यांची मानसिकता मात्र दिसून येत असते. आता तर एका शेतकऱ्याने राज्यपालांकडेच अशी मागणी केली आहे.
गांज्याची शेती करू द्या किंवा किडनी तरी विकण्याची परवानगी द्या', अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील पलढग (पोस्ट कोथळी) येथील गंगाधर बळीराम तायडे या कर्जबाजारी मागणी केली आहे. जेमतेम १ हेक्टर ६० आर शेत त्यांच्याकडे आहे. ज्ञानगंगा अभयारण्याला लागून शेत असल्याने वन्यप्राणी पिकांची नासाडी करतात.
पिके वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करून राखण करावी लागते. अशी त्यांची अडचण झाली आहे. वन्य प्राण्यांच्या तावडीतून पिके वाचली तर निसर्गाची अवकृपा ठरलेली असते. कधी ओला तर, कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट तर कधी पिकांवर रोगराई अशी संकटे सुरूच असतात.
अशा परिस्थितीत हाती आलेल्या पिकांना बाजारात भाव मिळत नाही अशी व्यथा त्यांनी सांगितली. परिश्रम करून हाती काहीच लागत नाही, पिकांसाठी केलेल्या खर्चाएवढेही उत्पन्न हाती येत नाही त्यामुळे पिकासाठी घेतलेले कर्ज फेडणे कठीण होऊन बसते. अशी व्यथा या शेतकऱ्याने मांडली आहे.
शेतीत कितीही कष्ट केले तरी नुकसान हे निश्चित असते अशी परिस्थिती आहे. पिक कर्जाची रक्कम पुरत नाही त्यामुळे खाजगी सावकाराकडून अवाजवी व्याज दराने रक्कम घ्यावी लागते, सावकाराकडून सतत तगादे सुरु असतात, पुन्हा पुनः अपमान सहन करावा लागतो शिवाय कर्जाचे ओझे वाढत राहते.
अशा परिस्थितीमुळे आत्महत्या करण्याचा विचार बळावतो पण मन तयार होत नाही. आत्महत्या केली तर शासनाकडून घरच्यांना काही रक्कम मिळेल पण मी एकमेव कर्ता पुरुष असल्याने घरचे उघड्यावर पडतील. माझ्या लेकरांना बाप मिळणार नाही.
त्यामुळे एक तर गांज्याची शेती करू द्या अथवा किडनी विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या या मागणीची मोठी चर्चा होऊ लागली आहे. बळीराजावर काय परिस्थिती बेतली आहे याचेच हे बोलके उदाहरण ठरत आहे. त्यांनी थेट राज्यपाल यांच्याकडे ही मागणी केल्याने प्रशासन निशब्द झाले असून, शेतकऱ्याची वेदना ऐकून महाराष्ट्राची झोप पुन्हा एकदा उडाली आहे.
गांजाची शेती करू द्या किंवा किडनी तरी विकण्याची परवानगी द्या अशी मागणी या शेतकऱ्याने लेखी स्वरुपात केली आहे. गांजा लागवड करण्याची परवानगी या आधीही काही शेतकऱ्यांनी केली होती पण त्यांना परवानगी मिळालेली नाही, यावेळी मात्र या बळीराजाने किडनी विकण्याचीही परवानगी मागितली असून कृषीमंत्री, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार संजय गायकवाड यांनाही आपल्या मागणीचे पत्र त्यांनी दिले आहे.
आपल्या मागणीची पूर्तता केली नाही तर मात्र , येत्या २ जूनपासून मुंबई येथील मंत्रालय समोर आंदोलन करण्याचा इशारा तायडे यांनी दिला आहे. 'शेतकऱ्यांचे सरकार' असे भाषणातून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात बळीराजा कुठल्या अवस्थेत आहे, हेच या पत्रातून पुन्हा समोर आले आहे.


0 Comments