आता ३४ ते ५८ रुपयांत मिळेल कोणताही दाखला!प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
दाखले देण्यास टाळाटाळ केल्यास किंवा शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काशिवाय जास्त रक्कम घेतल्यास त्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावी -प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांची मुदत व मुदतवाढ संपल्याने आता नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यासाठी किमान दीड महिन्यांचा अवधी जाणार आहे.
२५ मेपासून अकरावी प्रवेशाला सुरवात होणार आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांसह सर्वच लाभार्थींसाठी 'शासन आपल्या दारी' ही विशेष मोहीम जिल्हाभरात सुरू केली आहे. पाच मिनिटे ते एक तासात दाखला देण्याची सोय तेथे केली आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, दगड खाणपट्टा परवाना, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, पत दाखला, जन्म व मृत्यू दाखला, मिळकत प्रमाणपत्र, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, गौणखनिज परवाना,
वारसा प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, खडी क्रशर परवाना, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, भूमिहीन शेतमजूर, नवीन रेशनकार्ड, दुबार रेशनकार्ड, शिधापत्रिकेत वाढ किंवा नावे कमी करणे, विभक्त शिधापत्रिका असे अनेक दाखले दिले जातात.
त्यासाठी निश्चित केलेल्या दरातच महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी दाखले द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दुसरीकडे विशेष मोहिमेच्या माध्यमातून सर्वच दाखले एका ठिकाणी देण्याची सोय देखील केली आहे.
अकरावी प्रवेशाला सुरवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी 'शासन आपल्या दारी'अंतर्गत जिल्हाभर विशेष कॅम्प आयोजित केले आहेत. दुसरीकडे ग्रामपंचायतीतील आपले सरकार सेवा केंद्रे व महा-ई-सेवा केंद्रांमधूनही 'सेतू'च्या दरातच दाखले देण्याचे आदेश दिले आहेत.
- तुषार ठोंबरे, प्रभारी जिल्हाधिकारी, सोलापूर
एवढीच रक्कम द्या अन् दाखला घ्या
दाखला शुल्क
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३३.६० रुपये
वंशावळीचे प्रतिज्ञापत्र ३३.६० रुपये
अल्पभूधारक प्रतिज्ञापत्र ३३.६० रुपये
अधिवास प्रमाणपत्र ३३.६० रुपये
मृत्यू दाखला ३३.६० रुपये
जातीचा दाखला ५७.६० रुपये
नॉन क्रिमीलेअर ५७.६० रुपये
नवीन रेशनकार्ड ३३.६० रुपये
विभक्त रेशनकार्ड ३३.६० रुपये
जिल्ह्यात महसूल विभागाअंतर्गत ६९० महा-ई-सेवा केंद्रे आहेत. तर ग्रामपंचायतींमध्ये ७९६ आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. आता अकरावी प्रवेशाला सुरवात होणार असून निराधार योजनेच्या लाभार्थींना देखील आता हयातीचे व उत्पन्नाचे दाखले द्यावे लागणार आहेत.
त्यांना त्या केंद्रांवरून दाखले मिळणार आहेत. कोणीही टाळाटाळ केल्यास किंवा शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काशिवाय जास्त रक्कम घेतल्यास त्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावी.
त्या केंद्र चालकांवर दंडात्मक कारवाई, प्रसंगी फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जातील, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी दिला आहे. त्या केंद्रांची आता तलाठी, मंडलाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पडताळणी केली जात आहे.


0 Comments