धक्कादायक घटना.. उतावळा नवरा! लग्न झाले अन् देवदेव होताच नवरी पसार;
नवरदेवाची फसवणूक; १ लाख ७० हजारांचा गंडा
लग्न जमत नव्हते…. अशात बहुत्प्रयासाने वधू-वर सूचक मंडळाकडून एक स्थळ आले… पाहण्यासाठी पाहुणे मुलीसह नवरदेवाच्या घरी आले… त्याच दिवशी लग्नही उरकले…
चार दिवसांनी देवकार्य झाले मात्र, त्याच रात्री नवी नवरी दागिने घेऊन पसार झाली…
लग्न जमविणारे मध्यस्थही नवरदेवाला १ लाख १० हजार रूपयांचा गंडा घालून ‘नॉटरिचेबल’ झाल्याची धक्कादायक घटना सरकोली येथे घडली.
कैलास देविदास भालेराव ( वय ३१, रा. सरकोली) असे फसवणूक झालेल्या नवरदेवाचे नांव आहे.
एका साखर कारखान्यात लिपीक असलेल्या भालेराव यांचे अनेक दिवस लग्न जमत नव्हते. त्यांनी विविध ठिकाणी वधू-वर सूचक मंडळांकडे नोंदणी केली होती.
यातच दि.१७ एप्रिल रोजी नांदेड येथील देविदास ताटे याचा फोन आला. औरंगाबादची मुलगी असून तुमच्या घरी पाहण्यास येतो असे त्याने सांगितले.
दुसऱ्याच दिवशी ते पंढरपुरात येऊन मुक्कामी थांबले. दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता बोलेरो जीपने (एम. एच. २२ / यू. २१७१) देविदास ताटे, शीतल भीमराव धुमाळ नावाची मुलगी,
तिचा मामा बाळू कदम, विष्णु काकडे व पूजा पवार (रा.वर्धा) नाव सांगणारी तिची बहीण असे सर्वजण भालेराव यांच्या घरी पोहोचले.
दोन्हीकडून ओळखी करून दिल्या गेल्या. स्थळ सर्वांना पसंद पडले. त्यानंतर मध्यस्थ ताटे याने आपल्याला १ लाख व गाडीभाडे १० हजार द्यावे लागेल. तसेच आजच लग्न करावे लागेल, अशी अट घातली.
नवरदेव भालेराव यांनी ती मान्य करून लग्नाची तयारी केली. सर्वांच्या साक्षीने लग्न पार पडले. ठरल्यानुसार ताटे यांना पैसे दिल्यानंतर ते सर्वजण निघून गेले.
दि.२३ एप्रिलपर्यंत देवकार्य आटोपून रात्री ११ वाजता सर्वजण झोपी गेले. त्यानंतर रात्रीतच नवरी शीतल ही सुमारे ६० हजारांचे दागिने घेऊन पसार झाली.
याबाबत भालेराव यांनी ताटे व इतरांशी संपर्क साधला. सुरूवातीला त्यांनी वेळ मारून नेली. त्यानंतर त्यांनी सर्वजण ‘नॉटरिचेबल’ झाले.
याद्वारे सदर चौघांनी फसवणूक केल्याची फिर्याद कैलास भालेराव यांनी तालुका पोलिसांत दिली आहे.


0 Comments